Poonam Pandey On Pranit More Controversy : प्रणित मोरेच्या शोमध्ये एका तरुणाने महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. स्वत:च्या डेटिंगचा अनुभव सांगताना “बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलंय, मग ते पैसे वसूल नको का करायला?” असं वादग्रस्त वक्तव्य २३ वर्षीय हिमांशु जांग्राने भर कार्यक्रमात केलं. बिर्याणीच्या पैशांच्या बदल्यात तो महिलेकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा करत होता. तिच्याकडून ३७० रुपये ‘वसूल’ करायचे होते, असं वादग्रस्त विधान हिमांशूने यावेळी केलं. महत्त्वाचं म्हणजे, प्रणितने हे सगळं सुरू असताना आक्षेप घेण्यापेक्षा संबंधित तरुणाला प्रतिसाद देत त्याला प्रोत्साहन दिलं. या सगळ्या प्रकरणानंतर हिमांशू आणि प्रणित या दोघांनी त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स बंद केले आहेत. हिंमाशूच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.
याशिवाय, या ‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरणावर नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेने, “आम्ही महिला ३७० रुपयांपेक्षा महागडे सॅनिटरी पॅड्स वापरतो आणि नंतर हे पॅड्स फेकून देतो” असं सांगत प्रणित व हिमांशूचा चांगलाच समाचार घेतला आहे.
पूनम पांडे म्हणते, “भाई…हे सगळं नेमकं काय सुरूये? मी आताच ३७० रुपयांच्या बिर्याणीचं प्रकरण ऐकलं. वाह बेटा…काय विचार आहेत तुमचे. हे असे विचार असणाऱ्यांना मी एकच गोष्ट सांगेन.”
“आम्हा स्त्रियांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. जेव्हा पाळी येते…तेव्हा आम्ही सॅनिटरी पॅड्स खरेदी करतो. तर, सांगायचा मुद्दा असा की, त्या पीरेड्सदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पॅड्सची किंमतही ३७० रुपयांपेक्षा जास्त आहे. ते महागडे पॅड्स आम्ही वापरून फेकून देतो…त्यामुळे यापुढे महिलांबद्दल जरा तोंड सांभाळून बोलत जा. तुम्ही महिलांबद्दल बोलताय हे विसरू नका.” असं सांगत पूनमने या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रणित मोरेने काही दिवसांपूर्वीच या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तो म्हणाला होता, “प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या त्या व्यक्तीने केलेली विधानं ही माझी वैयक्तिक मतं नाहीत. तिथे हसण्याऐवजी मी आक्षेप घ्यायला हवा होता. माझ्याकडून ही चूक झाली…लाइव्ह कार्यक्रमांमध्ये तात्काळ प्रतिक्रिया द्यावी लागते पण, यामुळे माझी चूक झाकली जाणार नाही. मी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतो आणि भविष्यात अशा प्रसंगी मी अधिक विचारपूर्वक वागेन.” तर, हिमांशू जांग्राची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
