एखादा चित्रपट योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम कथा, कलाकारांचा सहज अभिनय, याबरोबरच उत्तम दिग्दर्शक असणे गरजेचे असते. चित्रपट यशस्वी होण्यासाठी इतर काही गोष्टींबरोबर दिग्दर्शक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. कलाकारांप्रमाणेच दिग्दर्शकही वेळोवेळी चर्चेत येत असतात. चित्रपटांबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई(Subhash Ghai) व त्यांच्या पत्नी चर्चेत आल्या आहेत. त्यांनी त्यांचे मुंबईतील एक अपार्टमेंट विकले असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात त्यांनी त्यांचे अपार्टमेंट किती रुपयांना विकले आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सुभाष घईंनी किती कोटींंना विकलं घर?

सुभाष घई व त्यांची पत्नी मुक्ता यांचे मुंबई, अंधेरी (पश्चिम) येथे एक अपार्टमेंट होते. आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हे अपार्टमेंट विकले आहे. Zapkey.com च्या नियंत्रणात असलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, सुभाष घई यांचे हे अपार्टमेंट मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील रुस्तमजी एलिटा या इमारतीत १४ व्या मजल्यावर आहे. १७६० स्क्वेअर फूट इतकी या अपार्टमेंटची जागा आहे. या अपार्टमेंटला दोन कार पार्किंगचीसुद्धा जागा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट १२.८५ कोटींना विकले आहे. त्यांनी २०१६ मध्ये हे अपार्टमेंट ८.७२ कोटींना विकत घेतले होते. त्यामुळे सात वर्षात त्यांना ४७ टक्के नफा झाला आहे. समीर गांधी यांना हे अपार्टमेंट विकण्यात आले आहे. २२ जानेवारी २०२५ ला नोंदणी झाली असून याची स्टॅम्प ड्युटी ७७ लाखांपेक्षा जास्त आहे आणि नोंदणी शुल्क ३० हजारांपेक्षा जास्त आहे. हे अपार्टमेंट असलेल्या भागात अनेक कलाकार, निर्माते व दिग्दर्शकांची घरे आहेत.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन व अक्षय कुमारने येथील त्यांचे अपार्टमेंट विकल्याचे समोर आले होते. तेव्हा ते मोठ्या चर्चेत होते. अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवारा येथील डुप्लेक्स अपार्टमेंट ८३ कोटींना विकले. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, बिग बींनी हे अपार्टमेंट एप्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यांनी ते ८३ कोटी रुपयांना विकले, तर अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली पूर्व येथील त्याचे अपार्टमेंट ४.२५ कोटी रुपयांना विकले, जे त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये २.३८ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

दरम्यान, सुभाष घई यांनी ‘परदेस’, ‘राम लखन’, ‘कर्मा’, ‘ताल’, ‘यादें’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘युवराज’, ‘कांची’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘परदेस’ चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular director subhash ghai and wife mukta sell mumbai apartment for rs 13 crore know nsp