टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राची देसाई आज ३८ वर्षांची झाली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्राचीने पुढे अनेक चित्रपटांमध्येही काम केलं. याच काळात तिचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर जोडलं गेलं होतं. परिस्थिती इतकी बिगडली होती की, रोहित शेट्टीच्या संसारातही वादळ निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, प्राची सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. आज तिचा वाढदिवस असल्याने ती सध्या काय करते जाणून घेऊ.

प्राची देसाईचा जन्म १२ सप्टेंबर १९८८ रोजी गुजरातमधील सुरत शहरात झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळे अवघ्या १७व्या वर्षी तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ही मालिका २००६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत प्राचीने अभिनेता राम कपूरबरोबर काम केलं होतं. विशेष म्हणजे, राम कपूर प्राचीपेक्षा तब्बल १५ वर्षांनी मोठा आहे.

अभिनयाबरोबरच प्राची देसाई नृत्यातही पारंगत आहे. तिने आपल्या चित्रपटांमधून अभिनयाबरोबर तिच्या नृत्यानेही अनेकांची पसंती मिळवली. याशिवाय ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही तिने आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. २००७ मध्ये प्राची या शोच्या दुसऱ्या पर्वाची विजेती ठरली होती.

२००८ मध्ये ‘रॉक ऑन’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण

प्राची देसाईने २००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘लाइफ पार्टनर’, ‘आय, मी और मैं’, ‘पोलिसगिरी’, ‘अजहर’ आणि ‘रॉक ऑन २’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

१४ वर्षांनी मोठ्या रोहित शेट्टीबरोबर अफेअरच्या चर्चा

India.comच्या रिपोर्टनुसार, ‘बोल बच्चन’च्या शूटिंगदरम्यान प्राची देसाई आणि रोहित शेट्टी एकमेकांच्या जवळ आल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी रोहित शेट्टी आधीच विवाहित होता. रिपोर्टनुसार, रोहित ने पत्नीला सोडून काही काळ प्राचीबरोबर राहण्यास सुरुवात केल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यानंतर रोहित पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतल्याचं सांगितलं जातं.

प्राची देसाई व रोहित शेट्टी

आता काय करतेय प्राची देसाई?

प्राची देसाई सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. सध्या तिच्याकडे कोणताही नवीन प्रोजेक्ट नसल्याचं सांगितलं जातं. अभिनेत्री २०२४ मध्ये झी ५ वर प्रदर्शित झालेल्या ‘Silence 2: The Night Owl Bar Shootout’ या थ्रिलर चित्रपटात शेवटची दिसली होती. सोशल मीडियावरही ती फार सक्रीय नसते आणि एप्रिल २०२४मध्ये तिने शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.