Pradeep Rawat stayed at Salman Khan’s home for 6 months : ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायकाची भूमिका साकारून प्रचंड प्रसिद्धी मिळवणारे आणि ‘सरफरोश’, ‘लगान’ सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते प्रदीप रावत यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सलमान खानने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत भावासारख्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. सुरुवातीच्या काळात सलमानच्या घरात तब्बल ६ महिने राहणे, त्याच्याकडून मिळालेले कपडे आणि बँक क्लर्क असताना सलमानचं भेटायला येणं, या जुन्या आठवणी प्रदीप रावत यांनी सांगितल्या होत्या.

प्रदीप रावत व सलमान खानची चांगली मैत्री होती. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, प्रदीप यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात ते सलमान खानच्या घरी राहिले होते, असा खुलासा केला होता. १९९० मध्ये ‘बागी’ चित्रपटात काम करताना त्यांची सलमानशी मैत्री झाली. “त्याला वर्कआउट करण्याची प्रचंड आवड होती आणि मलाही. चार ते सहा महिन्यांचा असाही काळ होता जेव्हा सलमान मला घरीच जाऊ द्यायचा नाही. तो मला त्याच्या घरातून निघूच द्यायचा नाही. मी तिथेच खायचो, तिथेच झोपायचो, तिथेच वर्कआउट करायचो, कपडे बदलायचो, आंघोळ करायचो आणि मग त्याच्या घरातूनच कामासाठी बाहेर पडायचो,” असं प्रदीप रावत म्हणाले होते.

सलमान खान प्रदीप रावतसाठी भाड्याने कपडे आणायचा

“तो बऱ्याच पार्ट्यांना जायचा. अशा पार्ट्यांसाठी लागतात तसे सूट माझ्याकडे नसायचे. जेव्हा एखादी मोठी पार्टी असायची, तेव्हा सलमान माझ्यासाठी भाड्याने सूट आणायचा,” असं प्रदीप रावत यांनी सांगितलं होतं. काही काळाने प्रदीप रावत स्वतःच सलमानपासून दूर गेले, कारण त्यांना वाटलं की ते या लाइफस्टाइलमध्ये खूपच कम्फर्टेबल झाले आहेत. नंतर स्वतःच्या करिअरवर लक्ष देण्यासाठी सलमानपासून दूर जाणं त्यांना गरजेचं वाटलं.

सलमान खानपासून का दूर गेले प्रदीप रावत?

प्रदीप रावत म्हणालेले, “त्यानंतर बराच काळ मी सलमानला भेटलो नाही. मला वाटलं की जर मी त्याच्याबरोबर जास्त काळ राहिलो तर शेरासाठी जागाच उरणार नाही, जो आता त्याचा बॉडीगार्ड आहे. बहुदा मीच त्यातच अडकून राहिलो असतो. मग मी स्वतःला समजावलं की हे कंफर्टेबल आयुष्य ठीक आहे…कंफर्टेबल म्हणजे संघर्षाच्या काळात तुम्हाला अन्न, राहायला जागा आणि सोबत राहायला लोक मिळतायत, मग आणखी काय हवं? पण खरं तर यामुळे मला कामात काहीही फायदा होत नव्हता. त्यामुळे अशा लाइफस्टाइलमध्ये जास्त कंफर्टेबल व्हायला नको, असं मला वाटलं.”

salman khan pradeep rawat friendship
सलमान खानची प्रदीप रावत यांच्या निधनानंतर पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

बऱ्याच वर्षांनी जेव्हा रस्त्यात भेटले होते सलमान खान- प्रदीप रावत

प्रदीप रावत यांनी काही वर्षांनंतर सलमानला भेटल्याचा प्रसंग सांगितला होता. “अनेक वर्षांनंतर माझी सलमानशी अचानक भेट झाली. तो त्याच्या मोठ्या गाडीत होता आणि मी माझ्या मारुती व्हॅनमध्ये होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. त्याने आपली गाडी रस्त्याच्या मध्ये थांबवली. त्यामुळे मलाही माझी गाडी थांबवावी लागली. ट्रॅफिक जाम झाले. काही वेळातच लोकांनी सलमानला ओळखले आणि तिथे प्रचंड गर्दी झाली. तो त्याच्या गाडीतून बाहेर आला, मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आणि एकमेकांजवळ गेलो. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, ‘तू कुठे होतास? तू तर गायबच झालास!'”

“तोपर्यंत रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस आले आणि आजूबाजूला लोकांचा गराडा झाला. त्याने विचारले, ‘तू सध्या काय करतोय? हे खूप चुकीचं आहे.’ मी म्हणालो, ‘मी इथे-तिथे शूटिंग करतोय.’ तो म्हणाला, ‘ठीक आहे भावा, येत जा भेटायला.'” चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी प्रदीप रावत जेव्हा बँकेत क्लर्क म्हणून काम करायचे, तेव्हा सलमान त्यांना बँकेत भेटायला यायचा, ती आठवणही रावत यांनी सांगितली.

प्रदीप रावत यांनी बँकेत भेटायला जायचा सलमान खान

“एक काळ असा होता जेव्हा सलमान माझ्याबरोबर खूप वेळ घालवायचा. मला सोडून तो जायचाच नाही. कधीकधी मी बँकेत असायचो, आणि तुमचा विश्वास बसणार नाही, सलमान भाई तिथे यायचा, दरवाजा उघडून बँकेत आत यायचा आणि मी काम करत असताना माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसायचा. विचार करा, एका बँकेच्या ऑफिसमध्ये बँक क्लर्कच्या शेजारी सलमान खान बसलाय,” असं प्रदीप रावत म्हणाले होते.

प्रदीप रावत यांच्या निधनानंतर, सलमान खानने सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर करून मित्राला श्रद्धांजली वाहिली. “भावा, तुझ्याबरोबर खूप चांगले क्षण घालवले, तुझ्या आत्म्याला शांती लाभो,” असं सलमान खानने लिहिलं. दरम्यान, प्रदीप रावत यांना विक्रमादित्य नावाचा १८ वर्षांचा मुलगा आहे.