Prahaar Box Office Collection Day 1: अभिनेता राजकुमार रावचा ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा कोर्टरूम ड्रामा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटाने किती कलेक्शन केले ते जाणून घेऊयात.

सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, प्रहारने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात ३.५२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात २.७७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर विदेशात ७५ लाख रुपये कमावले. त्यामुळे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ३.५२ कोटी रुपयांवर पोहोचले. देशभरात या चित्रपटाला ४,१३३ शो मिळाले होते आणि एकूण ऑक्यूपेन्सी १५ टक्के होती.

‘प्रहार’ चित्रपटाचं बजेट ६० ते ७० कोटींच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. बजेटची रक्कम वसूल करण्यासाठी या चित्रपटाला पहिल्या दिवसाच्या तुलनेत वीकेंडला दमदार कमाई करावी लागेल. आता वीकेंडला या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे चित्रपट

‘प्रहार’ हा चित्रपट सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित आहे. यात १९९३ चे बॉम्बे बॉम्बस्फोट आणि २००८ चे मुंबई हल्ले यांसारख्या भारतातील मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात या प्रकरणांमधील कायदेशीर लढाया आणि खटला चालवण्याची प्रक्रिया मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली आहे.

‘प्रहार’ चित्रपटातील कलाकार

‘प्रहार’ चित्रपटात राजकुमार राव उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत आहे. तर वामिका गब्बी ज्योती निकमच्या भूमिकेत आहे. मराठी अभिनेता ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. तसेच जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.