Prahaar Movie Lalit Prabhakar As Ajmal Kasab : ‘ईठा’चा दमदार टीझर प्रदर्शित केल्यावर आता मॅडडॉकने आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. येत्या ७ ऑगस्टला ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि कलाकारांचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ‘प्रहार’ सिनेमा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात ज्येष्ठ विधिज्ञ व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ‘प्रहार’ चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी आहे.
‘प्रहार’ सिनेमाची पहिली झलक समोर येताच मराठी प्रेक्षकांना एक सुखद धक्का मिळाला आहे. मराठी कलाविश्वाचा चॉकलेट हिरो ‘प्रहार’मध्ये झळकणार आहे. मात्र, हा अभिनेता दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारणार आहे. त्याचं नाव आहे ललित प्रभाकर. मराठी प्रेक्षकांनी ललितला आजवर विविध रोमँटिक व सकारात्मक भूमिका साकारताना पाहिलंय. पण, आता पहिल्यांदाच ललित एका वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याला अजमल कसाबच्या भूमिकेत पाहून चाहतेही शॉक झाले आहेत. “खरंच कसाबच्या भूमिकेत ललित आहे का?”, “ललितचा लूक पाहून शॉक बसला…”, “वेगवेगळ्या भूमिका अन् दमदार अभिनय…ललितला मानलं पाहिजे”, “मराठीचा चॉकलेट बॉय आता कसाबच्या भूमिकेत” अशा असंख्य प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

तर, ‘प्रहार’ सिनेमात उज्ज्वल निकम यांची मध्यवर्ती भूमिका बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव साकारणार आहे. त्याने या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारण्यासाठी त्याने कृत्रिम मेकअप किंवा प्रोस्थेटिक्स न वापरता ही भूमिका नॅचरल पद्धतीने कशी साकारता येईल याकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं.
‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या सिनेमात राकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासह वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केलं असून, निर्मिती दिनेश विजन यांची आहे. येत्या ७ ऑगस्टला या सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
