‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रहार’ सिनेमा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी ⁠अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात ज्येष्ठ विधिज्ञ व विशेष सरकारी वकील ⁠उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमात उज्जवल निकम यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव साकारत असून, दहशतवादी कसाबच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर झळकणार आहे.

‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा ३ मिनिट ५ सेकंदाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २६/११ चा हल्ला, कसाबने ऐनवेळी कशाप्रकारे आपलं स्टेटमेंट बदललं, उज्जवल निकम यांनी दिलेला लढा, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. या ट्रेलरच्या शेवटी प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो, जेव्हा कसाब खोटं बोलून, ‘मी फक्त मुंबई फिरायला आलो होतो आणि मी फक्त १७ वर्षांचा आहे’ असं सर्वांसमोर सांगतो. ललितला या वेगळ्या रुपात पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत.

ललितने सिनेमाचा ट्रेलर शेअर करताच त्याचा अभिनय पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर त्याच्या काही चाहत्यांनी, “ललित तुला आम्ही अजमल कसाबच्या भूमिकेत कसं पाहायचं?”, “निगेटिव्ह भूमिका आहे पण, ललितने उत्तम अभिनय केलाय” अशा प्रतिक्रिया या ट्रेलरवर दिल्या आहेत.

भूमिका कशी मिळाली?

“मला या ऑडिशनसाठी फोन आला होता…मग ऑडिशनची संपूर्ण प्रकिया पार पडली. मी अजमल कसाबची भूमिका साकारू शकेन असा विश्वास या टीमने माझ्यावर दाखवला आणि मला ही संधी मिळाली. अभिनय करताना माझी प्रतिमा एका विशिष्ट साच्यात अडकून राहणार नाही, यासाठी मी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांनी माझ्या अभिनयातील विविध पैलू पाहावेत अशी माझी कायम इच्छा असते. त्यामुळे मी मुद्दाम अशा सिनेमांची, अशाप्रकारच्या भूमिकांची निवड करतो, ज्या भूमिका माझी आधीची प्रतिमा मोडून काढतात आणि प्रेक्षकांना कायम आश्चर्यचकीत करतात.” असं ललितने इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ललितच्या फिल्मी क्षेत्रातील प्रवासाबद्दल…

ललित प्रभाकर गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्री सक्रिय आहे. मराठी टेलिव्हिजनपासून त्याने करिअरची सुरुवात केली होती. त्याची ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका सर्वत्र तुफान गाजली होती. यानंतर अभिनेत्याने २०१७ मध्ये ‘चि. व. चि. सौ. का.’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. ललितच्या ‘आनंदी गोपाळ’ सिनेमाला सुद्धा विशेष पसंती मिळाली होती. हंपी (२०१७), स्माईल प्लीज (२०१९), झोंबिवली (२०२२), मीडियम स्पायसी (२०२२), सनी (२०२२), कलरफूल (२०२२), आरपार (२०२५), प्रेमाची गोष्ट २ (२०२५), सुपर डुपर (२०२६) अशा बऱ्याच सिनेमांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता ललित ‘प्रहार’मध्ये अजमल कसाबच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.