अभिनेता राजकुमार राव आगामी ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबच्याविरोधातील खटल्यात उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारची बाजू मांडली होती. त्यावर हा चित्रपट आधारित आहे.
या चित्रपटात वामिका गब्बी उज्ज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती यांच्या भूमिकेत, तर ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहेत. मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असलेला ‘प्रहार’ येत्या शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी ‘प्रहार’ चित्रपट, राजकुमार राव आणि या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं.
विशेष म्हणजे, चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी राजकुमार रावबद्दल सांगितल्यानंतरच उज्ज्वल निकम यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजकुमार रावचा एकही चित्रपट त्यांनी पाहिला नव्हता आणि त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती.
उज्ज्वल निकम राजकुमार रावबद्दल काय म्हणाले?
‘प्रहार’ चित्रपटात राजकुमार राव आपली भूमिका साकारणार असल्याचं अविनाश अरुण यांनी उज्ज्वल निकम यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी एकच प्रश्न विचारला, “अविनाशजी, हा राजकुमार कोण आहे?” यानंतर अविनाश अरुण यांनी राजकुमार राव किती चांगला अभिनेता आहे, हे उज्ज्वल निकम यांना सांगितलं. त्यानंतर एकदा ते चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरण पाहण्यासाठी गेले. तिथे राजकुमार रावची भेट घेतल्यानंतर उज्ज्वल निकम त्याच्यामुळे प्रभावित झाले. राजकुमार रावचा साधेपणा आणि जमिनीवर राहून वागण्याची वृत्ती त्यांना भावली. “तो खरा अभिनेता आहे. मला त्याचा स्वभाव आवडला,” असं उज्ज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला सांगितलं. तसेच, आपली भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शकाने चांगल्या अभिनेत्याची निवड केली आहे, असं आपण अविनाश अरुण यांना सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं.
राजकुमार रावने चित्रपटात आपली बोलण्याची पद्धत, आवाजातील बारकावे आणि स्वभावातील वैशिष्ट्यं कितपत अचूकपणे साकारली आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकताही उज्ज्वल निकम यांना होती.
