एन.चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिम्हा’ सिनेमा १९९१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मीनू ही भूमिका साकारली होती. ही भूमिका आधी वेगळ्या दोन अभिनेत्रींना ऑफर करण्यात आली होती. यामध्ये एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा सुद्धा समावेश आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता कुलकर्णी. सध्या प्राजक्ता ‘ठरलं तर मग’ या टीआरपी टॉपर मालिकेत सायलीच्या सासूबाईंची भूमिका साकारत आहेत. पण, यापूर्वी त्यांनी अनेक हिंदीसह मराठी चित्रपट, ‘चार दिवस सासूचे’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
‘नरसिम्हा’ चित्रपटाची ऑफर आली तेव्हा, प्राजक्ता ‘धडाकेबाज’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होत्या. तारखा जुळत नसल्याने त्यांच्याकडे नकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. यानंतर ही भूमिका उर्मिला मातोंडकरने साकारली. पण, तिने मुलाखतीत राजेश्वरीचं ( जिला सर्वात आधी ‘नरसिम्हा’चा रोल ऑफर झाला ) नाव घेतलं पण, माझ्या नावाचा उल्लेख कुठेही केला नाही अशी खंत प्राजक्ता यांनी ‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.
प्राजक्ता दिघे-कुलकर्णी म्हणाल्या, “नरसिम्हा’ सिनेमाबद्दल मला जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हाच मी ‘धडाकेबाज’ चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यावेळी आमचं ‘धडाकेबाज’चं तिसरं शेड्युल सुरू होतं. ‘नरसिम्हा’साठी मला एन. चंद्रा यांचा फोन आला होता…त्यांनी मला चित्रपटाबद्दल वगैरे माहिती दिली. आधी त्यांनी एका हिरोईनला विचारलं होतं…पण ऐनवेळी तिला काहीतरी अडचण आली मग त्यांनी मला फोन केला. कारण, सेट वगैरे सगळं तयार होतं. त्यांना मग मी ‘धडाकेबाज’बद्दल सर्व सांगितलं. आमच्या तारखा जुळल्या नाहीत. मग शेवटी ‘नरसिम्हा’ चित्रपटातली भूमिका उर्मिला मातोंडकरने केली.”
“उर्मिला मातोंडकरचा त्या सिनेमानंतर एका मॅगझिनमध्ये इंटरव्ह्यू आला होता. त्यात तिने म्हटलं होतं की, ‘नरसिम्हा’ची भूमिका आधी राजेश्वरीला ऑफर झाली होती. पण, तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तिला शूटिंग जमलं नाही. त्या इंटरव्ह्यूमध्ये उर्मिलाने पुढे असंही लिहिलं होतं की, राजेश्वरीनंतर आणखी एका अभिनेत्रीला या रोलसाठी विचारणा झाली होती. पण ते सुद्धा जुळलं नाही…तिने कुठेही माझं नाव घेतलं नाही.”
“खरंतर, ती मला आधीपासून ओळखत होती. पण, तिने माझं घेतलं नाही. मराठी अभिनेत्रीच ओळख दाखवत नाहीत…यातलीच ती एक आहे. माझ्या बाबांनी उर्मिलाचा तो मॅगझिनचा इंटरव्ह्यू वाचला आणि तिच्या त्या ओळी अंडललाइन करून ठेवल्या होत्या. कारण, त्यांना खूप वाईट वाटलं होतं. ‘नरसिम्हा’ माझ्या हातून गेला…याचं त्यांना दु:ख होतं. पण, मी त्यांना समजावलं, की बाबा का वाईट वाटून घेताय? जेवढं माझ्या नशिबात असेल ते मला मिळणारच आहे. पण, आमची ओळख वगैरे होती..त्यामुळे तिने माझं नाव घ्यायला काहीच हरकत नव्हती. अर्थात ती कोणालाच ओळख दाखवत नाही.” अशी खंत यावेळी प्राजक्ता कुलकर्णींनी व्यक्त केली.
