रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालं. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. रणवीर सिंहच्या अभिनयाचंही अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच आता त्याच्या सासऱ्यांनी म्हणजेच दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांनी ‘धुरंधर’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश पादुकोण यांनी जावयाचा चित्रपट अनेकांना आवडला ही महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हटलं. त्यांनी याचबरोबर या चित्रपटात हिंसा जास्त असल्याचं म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसशीं संवाद साधताना त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी जावई रणवीरबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दलही सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…
धुरंधरबद्दल काय म्हणाले प्रकाश पादुकोण
‘धुरंधर’बद्दल प्रकाशा पादुकोण म्हणाले, “खूप चांगला चित्रपट आहे. खूप चांगल्या पद्धतीने बनवण्यात आला असून सगळ्यांनी चांगला अभिनय केला आहे. आम्हाला फक्त त्यात हिंसा थोडी जास्त प्रमाणात असल्याचं जाणवलं.पण, अनेक लोकांना हा चित्रपट आवडला ही महत्त्वाची गोष्ट आहे.”
प्रकाश पादुकोण यांनी केलं रणवीरचं कौतुक
प्रकाश पादुकोण यांनी पुढे दोन्ही कुटुंबातील जवळीकीबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “आम्ही खूपदा एकत्र वेळ घालवतो. दोन्ही कुटुंबीयांमधील नातं खूप छान आहे. वर्षातून एकदा तरी आम्ही सगळे एकत्र फिरायला जातो.” पुढे त्यांनी त्यांचा जावई रणवीरबरोबरच्या नात्याबद्दल आणि त्यांना एकत्र करायला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
रणवीरबद्दल ते म्हणाले, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला दोघांना आवडतात. त्याला क्रिडा क्षेत्रातही खूप रस आहे आणि मी त्याला चित्रपटांबद्दल विचारत असतो कारण मला त्यातील व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं असतं. ते लोक त्यांच्या कामात व्यग्र असल्याने त्यांना फारसा वेळ मिळत नाही, पण जेव्हा कधी रिकामा वेळ असतो तेव्हा आम्ही एकत्र क्रिकेट, फुटबॉलमध्ये वेळ घालवतो.”
दरम्यान, प्रकाश पादुकोण यांनी याचवेळी रणवीर सिंह आणि दीपिका यांच्या लेकीबद्दलही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की दुआच्या संगोपनात दीपिकाचं योगदान अधिक असून रणवीरला जसा वेळ मिळेल तशी तो मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर दुआला सामान्य माणसांप्रमाणे काही अनुभव घेता यावे म्हणून ती बंगळूरूला जाते तेव्हा तिला रिक्षामध्ये बसवणं, ट्रेनने प्रवास करणे अशा गोष्टी प्रकाश पादुकोण आणि त्यांच्या पत्नी करत असतात असं त्यांनी सांगितलं आहे.
