बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. अशातच त्याचे सासरे आणि भारताचे माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पादुकोण यांनी या चित्रपटावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरबरोबरचं त्यांचं नातं, धुरंधर चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद आणि स्वतः सोशल मीडियापासून दूर का आहेत, याबद्दलही त्यांनी सांगितलं. रणवीर व प्रकाश पादुकोण यांच्या आवडी-निवडी बऱ्याच सारख्या आहेत.

‘धुरंधर’ हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, असं मत प्रकाश पादुकोण यांनी व्यक्त केलं. चित्रपटातील हिंसक दृश्यांबद्दल काही लोकांचा आक्षेप असू शकतो, पण प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, असे ते म्हणाले. “हा एक अप्रतिम चित्रपट आहे. हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने बनवला गेला आहे आणि सर्वांनीच यात उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटात खूप जास्त हिंसा होती, असं मला वाटतं; पण बहुतांश लोकांना तो आवडला आहे, त्यामुळे तेच जास्त महत्त्वाचं आहे,” असं प्रकाश पदुकोण यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.

दोन्ही कुटुंबांमध्ये खूप चांगले संबंध

दोन्ही कुटुंबांमध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि ते अनेकदा एकत्र चांगला वेळ घालवतात. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये त्यांचे कुटुंब एकत्र असते, असंही प्रकाश पादुकोण यांनी सांगितलं. तसेच खेळ हा त्यांच्या व रणवीरच्या चर्चेचा एक महत्त्वाचा भाग असतो, असंही त्यांनी नमूद केलं. रणवीर व्यग्र असतो, त्यामुळे त्याच्याबरोबर फार वेळ मिळत नाही, पण जितका वेळ असेल तितका ते आनंदाने घालवतात, असं प्रकाश पादुकोण यांनी नमूद केलं.

रणवीर खेळाबद्दल बोलतो, मी चित्रपटांबद्दल विचारतो – प्रकाश पादुकोण

ते पुढे म्हणाले, “आमच्या अनेक आवडीनिवडी सारख्या आहेत, कारण त्याला खेळांमध्ये खूप रस आहे. तो माझ्याशी खेळांबद्दल बोलत असतो आणि मी त्याला चित्रपटांबद्दल विचारत राहतो, कारण मला या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचं असतं. ते खूप व्यग्र असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ मिळत नाही, पण जेवढा वेळ मिळतो, त्यात आम्ही एकत्र बसून फुटबॉल किंवा क्रिकेटचा आनंद घेतो. तो ‘आर्सेनल’चा (Arsenal) चाहता आहे आणि आमची मुलगी अनिशा ‘मँचेस्टर युनायटेड’ची चाहती आहे.”

प्रकाश पादुकोण यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचं कारणही सांगितलं. “मला माझ्या मुलींकडूनच सर्व माहिती मिळते. मी सोशल मीडियासारख्या सर्व गोष्टींपासून पूर्णपणे दूर आहे. आपल्याला कळतही नाही आणि आपण अर्ध्याहून जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतो. सोशल मीडिया म्हणजे नाहक वेळ वाया घालवणं आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी नाही,” असं प्रकाश पादुकोण म्हणाले.