सलमान खानचा ‘वॉन्टेड’ सिनेमा २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाची हिरोईन असलेल्या आयशा टाकियाच्या आईची भूमिका यामध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतीक्षा यांनी या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगत, सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला आहे.

प्रतीक्षा लोणकर सांगतात, “सेटवर सलमानशी माझा खूप असा संपर्क आला नव्हता. पण, त्याचं मला एक आठवतंय…त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खरंच खूप छान आहे. आमचं एकदा ‘वॉन्टेड’साठी फिल्मसिटीमध्ये शूट होतं. माझा आयशाबरोबर एक सीन होता. माझी दोन वाजताची शिफ्ट होती आणि चार वाजेपर्यंत माझे आयशाबरोबर सीन्स होते. तेव्हा सलमान ६ वाजेपर्यंत येणार होता. पुढे, मग सलमानचे फाइट सीक्वेन्स होते. मी तेव्हा निघत होते…सलमानने मला विचारलं, ‘तुम्ही निघालात का?’ मी ‘हो’ म्हणाले. यावर तो म्हणाला, ‘कशाला निघताय? मला वाटलं तुम्ही फाइट सीक्वेन्सला आलात की काय?’ म्हणजे अशा गमतीजमती…एकंदर खेळीमेळीचं वातावरण होतं.”

प्रतीक्षा लोणकर पुढे म्हणाल्या, “अर्थात आमचा सेटवर खूप कमी संबंध आला. पण, कम्युनिकेशन प्रॉब्लेम कधीच नव्हता. आमचे एकत्र हार्डली दोन सीन्स होते आणि सेटवर मी त्याच्याशी अगदी आरामात बोलू वगैरे शकत होते. आयशाबरोबर तर माझं बॉण्डिंग आधीपासूनच चांगलं होतं. कारण, आम्ही त्याआधी एकत्र ‘डोर’ सिनेमात काम केलं होतं.”

प्रतीक्षा लोणकर आणि आयशा टाकिया

‘वॉन्टेड’ सिनेमासाठी सुरुवातीला प्रतीक्षा लोणकर तयार नव्हत्या, याबद्दल त्या सांगतात, “वॉन्टेडसाठी मी सुरुवातीला तयार नव्हते. कारण, मला असं वाटत होतं…अरे खूप रडायचंय वगैरे. ‘वॉन्टेड’ सिनेमाची निर्मिती बोनी कपूर यांच्या प्रोडक्शनकडून करण्यात आली होती. ‘वॉन्टेड’ हा मूळ तेलुगू चित्रपट होता. तर, मला जेव्हा या सिनेमासाठी विचारलं, तेव्हा त्यांनी मला मूळ ‘पोकिरी’ चित्रपटाची सीडी पाठवून दिली होती. तर, मला वाटलं…अरे नुसतं रडायचं आहे. त्यावेळी निर्माते माझ्याबरोबर तीन चित्रपटांचं अग्रीमेंट करत होते. श्रीदेवी यांनी माझं काम यापूर्वी पाहिलं होतं. त्यामुळे मग आयशा टाकिया आणि माझं ऑनस्क्रीन बॉण्डिंग छान जुळेल असं त्यांना वाटत होतं. के. संजयला तेव्हा मी सांगितलं होतं, अरे यात काहीच नाहीये करण्यासारखं…तिची आई नुसतीच रडतेय.”

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर

“त्यावेळी मग के संजयने मला समजावलं, अगं तू ‘इक्बाल’ सिनेमा केलास..सर्व छान केलंस. पण, त्या चित्रपटांचा एक मर्यादीत प्रेक्षकवर्ग आहे. तुला जर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर, तुला असे कमर्शिअल सिनेमे सुद्धा करावे लागतील. बघ हा ‘वॉन्टेड’ सिनेमा तू नक्की कर म्हणजे तुला फरक जाणवेल. मग त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून मी काम केलं. खरंच, आजही मला ‘वॉन्टेड’मध्ये तुम्ही होतात ना…असं विचारलं जातं. त्यातही तो सलमानचा चित्रपट होता, मग खूपच गाजला” असं प्रतीक्षा लोणकर यांनी सांगितलं.