Prateik Smita Patil on his First Divorce : राज बब्बर-स्मिता पाटील यांचा मुलगा, अभिनेता प्रतीकने नुकतीच आयुष्यात नवीन सुरुवात केली आहे. त्याने प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं आहे. तो व प्रिया खूप आनंदी आहे. प्रतीकचं हे दुसरं लग्न होतं, पहिल्या लग्नात अपयशी ठरलेल्या प्रतीकने आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. दुसऱ्या लग्नानंतर ३ महिन्यांनी प्रतीकने पहिल्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं आहे.
घटस्फोटानंतर प्रेम व लग्नावर विश्वास उरला नव्हता. त्याच्या मनात सूडाची भावना जागी झाली होती, असं प्रतीकने सांगितलं. प्रतीकने बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत पहिलं लग्न मोडण्याबद्दल भाष्य केलं. हा त्याच्यासाठी एक मोठा मानसिक धक्का होता. लग्न मोडल्यावर त्याने ठरवलं होतं की प्रेम, रोमान्स आणि लग्न या गोष्टी त्याच्यासाठी नाहीत. या नात्याने त्याच्या आयुष्यात चांगलं काही घडलं नसलं तरी त्याने त्याचे कर्तव्य बजावले, असं त्याला वाटतं. पहिल्या नात्यात सर्वकाही दिलं, पण तरीही ते लग्न टिकलं नाही. त्यामुळे मनात प्रेम आणि लग्नाबद्दल खूप कटुता निर्माण झाली, असं प्रतीकने सांगितलं.
प्रतीक म्हणाला की त्याला प्रेमावर विश्वास राहिला नव्हता आणि तेव्हाच तो पुन्हा प्रेमात पडला. खरं तर मी किंवा प्रिया प्रेम शोधतच नव्हतो, पण कदाचित आम्ही असं एकत्र येणं नियतीने लिहिलं असेल, असं प्रतीकने सांगितलं. पण प्रिया कदाचित आधी भेटली असती तर तिच्याबरोबरचं नातंही फार काळ टिकू शकलं नसतं, असं प्रतीकला वाटतं.
प्रतीकच्या आयुष्यात कशी झाली प्रियाची एंट्री?
प्रतीकने त्याच्या व प्रियाच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. दोघांची पहिली भेट करोना लॉकडाऊनमध्ये झाली होती. प्रियाने तिचा साखरपुडा मोडला होता, तर प्रतीक त्याच्या घटस्फोटातून सावरत होता. खूप लोकांसाठी लॉकडाऊनचा काळ वाईट होता, पण प्रतीक म्हणतो की त्याच्यासाठी चांगला होता. कारण त्याला पुन्हा प्रेम मिळालं आणि त्याचं लग्नही झालं.
प्रतीकने इन्स्टाग्रामवर हजारो मुलींना केलं फॉलो
प्रतीक पुढे म्हणाला की पहिलं लग्न मोडल्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला होता. सगळ्या गोष्टींमुळे तो खूप चिडला होता आणि त्याच्या मनात सूडाची भावना जागृत झाली होती. त्यामुळे त्याने इन्स्टाग्रामवर हजारो सुंदर मुलींना फॉलो करायला सुरुवात केली. प्रतीक गोंधळलेला होता. त्याच्या लग्नात त्याच्याकडून काहीच चूक झाली नाही आणि सगळं खूप छान आहे असं त्याला दाखवायचं होतं. “माझ्यातील प्राणी जागा झाला होता,” असं प्रतीक म्हणाला.
दरम्यान, प्रतीकने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरं लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न २०१९ मध्ये सान्या सागरशी झालं होतं. ९ वर्षांची ओळख व अफेअरनंतर प्रतीक व सान्याने लग्न केलं होतं, पण अवघ्या ४ वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. २०२३ मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले.