Prateik Smita Patil Emotional Post On Fathers Day Ignores Dad Raj Babbar: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील याने ‘फादर्स डे’ निमित्त सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वडिलांशी असलेल्या मतभेदांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या प्रतीकने या खास दिवशी वडील राज बब्बर यांच्यासाठी कोणतीही पोस्ट न लिहिता आपले दिवंगत आजोबा शिवाजीराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आईच्या निधनानंतर आपल्याला वाढवणाऱ्या आणि संस्कार देणाऱ्या आजोबांनाच त्याने आपले ‘वडील आणि गॉडफादर’ म्हटले आहे. प्रतीकने दीड वर्षापूर्वी प्रिया बॅनर्जीशी केलेल्या दुसऱ्या लग्नातही वडिलांना बोलावले नव्हते आणि आता या पोस्टमुळे त्यांच्यातील वादावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.

प्रतीकची आई आणि दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचं प्रतीकच्या जन्मानंतर काही आठवड्यांतच निधन झालं होतं. त्यानंतर त्याचं संगोपन स्मिता पाटील यांच्या आई-वडिलांनी केलं होतं. आता प्रतीकने त्याला घडवण्याचे पूर्ण श्रेय आजोबांना दिले आहे. प्रतीकने आपल्या आजोबांना ही आदरांजली वाहिली असली, तरी या फादर्स डेच्या पोस्टमध्ये त्याने आपले वडील राज बब्बर यांचा अजिबात उल्लेख न केल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

प्रतीक स्मिता पाटीलने आजोबांसाठी केली पोस्ट

प्रतीकने आपल्या आजोबांबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “माझं अस्तित्व असण्यामागचं कारण आणि माझे गॉडफादर असलेल्या माझ्या आजोबांना फादर्स डेच्या शुभेच्छा. मी खूप नशीबवान होतो की तुम्ही माझे वडील आणि आजोबा दोन्ही म्हणून मला लाभलात. तुमच्या प्रेमाबद्दल आणि या जगात मी तुमच्याबरोबर घालवलेल्या काही वर्षांबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी आणि कृतज्ञ राहीन. मी जसा जसा मोठा होत आहे, तशी मला जाणीव होत आहे की तुम्ही मी या जगात पाहिलेले तुम्ही सर्वात महान व आदरणीय व्यक्ती होतात. माझे संगोपन केल्याबद्दल आणि तुमच्यातील उत्तम संस्कार माझ्यात रुजवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या विलक्षण वारशाचा एक भाग असल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. आपण पुन्हा एकत्र येत नाहीत तोपर्यंत मी रोज तुम्हाला सेलिब्रेट करेन आणि मग आपण अनंतकाळासाठी एकत्र आनंद साजरा करू ‘पा’. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.”

प्रतीक व राज बब्बर यांच्यातील मतभेद

प्रतीक आणि त्याचे वडील राज बब्बर यांच्यातील नातं नेहमीच चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. प्रतीक अनेक वर्षे राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळ होता. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांच्यातील संबंध बिघडले. त्याची जाहीरपणे चर्चा तेव्हा झाली जेव्हा प्रतीकने जेव्हा आपलं नाव ‘प्रतीक बब्बर’ बदलून ‘प्रतीक स्मिता पाटील’ केलं. तसेच दीड वर्षापूर्वी प्रतीकने प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं, तेव्हा त्याने त्याचे वडील व सावत्र भावंडांना लग्नात बोलावणं टाळलं.

आर्य बब्बरने प्रतीकवर केले आरोप

काही दिवसांपूर्वी प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बर याने प्रतीकवर आर्थिक मदतीसाठी वडिलांचा वापर केल्याचा आरोप केला. एका मुलाखतीत आर्य म्हणाला, “जेव्हा तुझं करिअर चांगलं चालत नसेल आणि जगण्यासाठी तुम्हाला वडिलांकडून पैशांची गरज असते तेव्हा ते तुझे वडील असतात. जेव्हा तुला तुझ्या वडिलांनी स्मिता आईसाठी घेतलेल्या घरात राहायचं असतं, तेव्हा ते तुझे वडील असतात. जेव्हा तुला काही हवं असतं तेव्हा ते तुझे वडील असतात, पण जेव्हा समाजासमोर त्यांना वडील म्हणून स्वीकारण्याची आणि आदर देण्याची वेळ येते, तेव्हा ते तुझे वडील नसतात. हे सगळं काय आहे? एक मोठा भाऊ म्हणून माझं त्याच्यावर प्रेम आहे, पण जेव्हा तो चुकीचा असतो तेव्हा तो चुकीचाच असतो; आणि इथे तो पूर्णपणे चुकतोय.”