Preity Zinta on 18 hour shift: प्रीती झिंटाने ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘कल हो ना हो’, ‘वीर-झारा’, ‘दिल हैं तुम्हारा’, ‘कोई मिल गया’, ‘कभी अलविदा ना कहना’ अशा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बटवारा १९४७’ या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

प्रीती झिंटा आता लवकरच आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वाइब’ असे या सिनेमाचे नाव आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या कार्यक्रम व प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच एका मोठ्या कार्यक्रमात सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी अभिनेत्रीने ८ तासांची शिफ्ट, काम आणि खासगी आयुष्य यांतील समतोल यावर वक्तव्य केले.

“मी १८-१८ तास…”

प्रीतीने खुलासा केला की ती १८ तास काम करत असे, तसेच तिने याचे कारणही सांगितले. ती म्हणाली, “प्रत्येकाचे एक कारण असते. मी १८-१८ तास काम केले आहे. याचे कारण असे होते की मला लवकरात लवकर माझे काम संपवून अमेरिकेला जायचे असायचे. कारण- माझी मुले तिथे असायची, त्यामुळे मला त्यांना भेटायचे असे, त्यामुळे भारतात येऊन माझे काम लवकरात लवकर पूर्ण करून लवकर माझ्या मुलांकडे मला परतणे यावरच माझे लक्ष केंद्रित असे, त्यामुळे मी १८ तास काम करत असे. पण, १८ तास काम करणे सोपे नव्हते, मी खूप थकत असे.”

दीपिका पादुकोणने मुलीच्या जन्मानंतर आठ तासांची कामाची शिफ्ट असावी अशी मागणी केली होती. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी तिला समर्थन दिले होते. अनेक कलाकारांनी यावर त्यांची मते मांडली होती. काहींनी विरोधही केला होता. काही रिपोर्टनुसार, ८ तासांच्या कामाच्या मागणीमुळे दीपिकाला काही मोठ्या चित्रपटातून बाहेर पडावे लागले आहे.

प्रीती झिंटाच्या नवीन सिनेमाबद्दल बोलायचे तर ‘वाइब’ या सिनेमाचे दिग्दर्शन कुणाल खेमूने केले आहे. तसेच लेखनही कुणाल खेमूने केले आहे. कुणाल सिनेमात अभिनय करतानाही दिसणार आहे. या चित्रपटात दोन मित्रांची गोष्ट पाहायला मिळते. त्यांचे आयुष्य अचानक बदलून जाते. या चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.