Priety Zinta Talks About Dhurandhar : सध्या ‘धुरंधर’ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक कलाकार मंडळीही चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री प्रीती झिंटानंही हा चित्रपट पाहिला असून, त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रीतीनं यावेळी तिला हा चित्रपट खूप आवडल्याचं सांगितलं आहे.

प्रीती झिंटानं आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहिला असून, तिनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीनं यावेळी चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शकाचं भरभरून कौतुक केलं आहे आणि पुन्हा हा चित्रपट पाहण्यासाठी ती उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

प्रीती झिंटाची प्रतिक्रिया

प्रीती झिंटानं एक्सवर पोस्ट शेअर करीत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “आजचा दिवस खूप छान होता. खूप दिवसांनंतर मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. संध्याकाळचा शो हाउसफुल होता. खूप छान होता. मी खूप दिवसांनंतर इतका चांगला चित्रपट पाहिला.” यावेळी तिनं रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांचं कौतुक केलं.

Award Banner

चित्रपटांतील कलाकारांबद्दल ती म्हणाली, “चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं खूप चांगलं काम केलं आहे. चित्रपटाचं म्युझिकसु्द्धा चांगलं आहे. आदित्य धरनं खूप चांगलं दिग्दर्शन केलं आहे.” प्रीती झिंटा पुढे म्हणाली, “‘धुरंधर’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाचं आणि आपलं रक्षण करणाऱ्या प्रत्येक देशभक्त स्त्री-पुरुषासाठी प्रेमपत्र आहे.”

प्रीती झिंटा चित्रपटाबद्दल पुढे म्हणाली, “साडेतीन तासांचा चित्रपट कधी संपला ते कळलंच नाही. मी पुन्हा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. आदित्य धर हा चित्रपट मला किती आवडला आणि हा चित्रपट किती चांगला आहे हे मी तुला शब्दांत सांगू शकत नाही. तोपर्यंत मला एवढंच म्हणायचं आहे की, अधिकाधिक रसिकांनी हा चित्रपट नक्की जाऊन पाहावा.”

दरम्यान, आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित ‘धुरंधर’ ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत असून, अनेक जण चित्रपटाचं, कलाकारांचं कौतुक करीत आहेत.