अभिनेत्री प्रीती झिंटा अनेक वर्षांनंतर ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा अभिनेता सनी देओलबरोबर झळकणार आहे. अशातच नुकतंच तिने वैयक्तिक आयुष्य, हिंदी चित्रपटसृष्टीतील बदल आणि सनी देओलबरोबरच्या जुन्या आठवणींवर मनमोकळेपणाने भाष्य केलं.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटानंतर प्रीती झिंटा बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होती. इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करण्यामागचं कारण सांगताना जागरणच्या वृत्तानुसार ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचे क्षण जगत होते. कुटुंबाबरोबर वेळ घालवत होते आणि मातृत्वाचा आनंद घेत होते. करिअरला मी भरपूर वेळ दिला. त्यानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं होतं.” प्रीती झिंटा पुढे म्हणाली, “माझ्या मते आयुष्यातील प्रत्येक टप्पा मनापासून जगला पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. मीही नेमकं तेच करत होते. भारताबाहेर राहत असताना मला भारताची खूप आठवण यायची. मात्र, मला अभिनयाची कधीच उणीव भासली नाही. कारण सध्या मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची भूमिका साकारत आहे, ती म्हणजे आईची भूमिका.”
कमबॅकसाठी ‘बंटवारा १९४७’च का निवडला?
पुनरागमनासाठी ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाची निवड का केली, याबाबत प्रीती झिंटा म्हणाली, “मला नेहमीच दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. यापूर्वी आम्ही कधीच एकत्र काम केलं नव्हतं. तसेच, मला अशाच चित्रपटात काम करायचं होतं. या चित्रपटाची कथा मला खूप आवडली. आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीतही आशेचा एक किरण असतो, हा या चित्रपटाचा संदेश आहे. अनेक जण हा भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित चित्रपट असल्याचं म्हणतात, पण प्रत्यक्षात ही एका कुटुंबाची कथा आहे. फाळणीच्या भीषण परिस्थितीतून ते कुटुंब कसं जातं, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.”
हिंदी चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांबाबत बोलताना प्रीती म्हणाली, “आज भारत स्वतःच्या कथा अभिमानाने सांगत आहे. आपल्या संस्कृती, विविध प्रदेश, खरे नायक, सैन्य आणि देशाशी निगडित अनेक विषयांवर आता चित्रपट तयार होत आहेत. मी करिअरची सुरुवात केली तेव्हा मात्र एनआरआय (परदेशात राहणारे भारतीय) यांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या कथा मोठ्या प्रमाणावर पडद्यावर दिसायच्या. परदेशात त्यांना काय मिळतं, यावरच अनेक चित्रपट आधारित असायचे.” हिंदी चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांबद्दल बोलताना प्रीती झिंटा पुढे म्हणाली, “आता आपल्या सिनेमातून देशाच्या यशोगाथा आणि इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. अनेक विषयांवर चित्रपट तयार होत आहेत. आज भारतीय जगभरात आपला ठसा उमटवत आहेत आणि त्याचं प्रतिबिंब आता आपल्या सिनेमातही दिसत आहे.”
प्रीती झिंटावर संतापलेला सनी देओल
‘फर्ज’, ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘हिरोज’ आणि ‘भैय्याजी सुपरहिट’नंतर ‘बंटवारा १९४७’ हा प्रीती झिंटा आणि सनी देओल यांचा एकत्रित पाचवा चित्रपट आहे. सनी देओलबरोबरचं नातं काळानुसार अधिक घट्ट झाल्याचं सांगताना प्रीती म्हणाली, “आता इतके चित्रपट एकत्र केल्यानंतर आमच्यात खूप मोकळेपणा आला आहे. पण पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करताना मला त्यांची खूप भीती वाटायची. खरं तर, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच माझी आणि बॉबी देओलची खूप चांगली मैत्री होती. एकदा माझ्या काही मित्रांनी रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास बॉबीला फोन करण्यास सांगितलं. मी फोन केला, पण तो सनी सरांनी उचलला. ते लगेचंच, फोन करण्याची ही काय वेळ आहे? असं म्हणत मला ओरडले.”
प्रीती पुढे म्हणाली, “मी लगेच फोन ठेवून दिला. इतकंच नाही, तर त्या प्रसंगाबद्दल मी माझ्या डायरीतही लिहिलं होतं. त्यानंतर जेव्हा सनी सरांबरोबर फर्ज या चित्रपटात पहिल्यांदा काम करण्याची वेळ आली, तेव्हा मला वाटलं त्यांना तो प्रसंग आठवत असेल. मात्र, तसं काहीच नव्हतं. तरीही फर्जचं संपूर्ण शूटिंग थोड्या तणावातच पार पडलं. त्यानंतर द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय या चित्रपटाच्या वेळी मात्र आम्ही एकमेकांशी अधिक मोकळेपणाने वागू लागलो आणि आमच्यात चांगली मैत्री निर्माण झाली.”
