Preity Zinta Rents Luxury Apartment in Bandra: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिने मुंबईत भाड्याने घर घेतले आहे. वांद्र्यामध्ये तिने घर भाड्याने घेतले आहे. आता तिच्या घराचे भाडे इतके जास्त आहे की, त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
सीआरई (CRE) मॅट्रिक्सनुसार, प्रीती झिंटाने मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिलमध्ये एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ही अभिनेत्री या घरासाठी एक वर्षभर दरमहा ६ लाख रुपये भाडे देणार आहे. पुढील वर्षी यामध्ये वाढ होणार आहे. १३ व्या महिन्यापासून २४ व्या महिन्यापर्यंत भाडे वाढून ६ लाख ५० हजार रुपये होईल. प्रीतीने या घरासाठी २ लाख ७० हजार रुपयांचे डिपॉझीट दिले आहे. तिच्या या फ्लॅटचे क्षेत्रफळ १५०० चौरस फूट आहे, तर पार्किंगची जागा १०० चौरस फूट आहे.
यापूर्वी प्रीती झिंटाने मार्च २०२६ मध्ये पाली हिलमधील तिचा बंगला कोट्यवधी रुपयांना विकला होता. CRE मॅट्रिक्सला मिळालेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, प्रीती झिंटाने मुंबईच्या वांद्रे भागातील पाली हिलमधील एक अपार्टमेंट १८.५० कोटी रुपयांना विकले होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रीतीने रुस्तमजी परिश्रम बिल्डिंगच्या ११ व्या मजल्यावरील १४७४ चौरस फुटांचे अपार्टमेंट १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकले होते.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच आमिर खान प्रॉडक्शन्सच्या ‘बंटवा १९४७’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल, करण देओल, शबाना आझमी आणि अली फजल यांच्यासोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. फाळणीवर आधारित या सिनेमाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘बंटवा १९४७’मधील कलाकारांचा लूक नुकताच समोर आला आहे. हा सिनेमा १४ ऑगस्ट २०२६ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रीती झिंटा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती विविध फोटो, आयपीएलमधील व्हिडीओ तसेच तिचे अनेक व्हिडीओ-फोटो, सहकलाकारांच्या आठवणी शेअर करते.
दरम्यान, अभिनेत्रीचे ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’, ‘कभी अलविदा ना कहना’ असे अनेक सिनेमे गाजले आहेत.
