सलमान खान बॉलीवूडमधील असा अभिनेता आहे ज्याच्याबरोबर काम करण्यास अनेक कलाकार उत्सुक असतात पण याचवेळी त्याच्याबरोबर काम करताना त्यांना भीतीही वाटते. यामागे त्याची इंडस्ट्रीतील प्रतिमा, अनुभव ही कारणंही असू शकतात. अशातच आता प्रीती झिंटानेही याबद्दल सांगितलं आहे. प्रीती झिंटा नुकतीच सनी देओलबरोबर ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटात दिसली होती. आता ती कुणाल खेमूच्या ‘वाइब’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. याचदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की, पूर्वी तिला सलमान खानची थोडी भीती वाटायची.
‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रीती झिंटाबरोबर ‘वाइब’ चित्रपटातील सहकलाकार कुणाल खेमू, वंशिका धीर आणि स्पर्श श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते. यावेळी सर्वांना विचारण्यात आलं की, “तुमच्या करिअरमध्ये कोणत्या कलाकाराबरोबर तुमची वाइब जुळवणं सर्वात कठीण होतं? सुरुवातीला वेळ लागला, पण नंतर एकूणच तुमची वाइब खूप छान जमली?”
सलमानबद्दल काय म्हणाली प्रीती?
प्रीती झिंटाने या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान खानचा उल्लेख केला. ती म्हणाली, “तसं पाहिलं तर माझं सगळ्यांबरोबर चांगलं जमतं. पण खरं सांगायचं तर मला सलमान खानची नेहमीच थोडी भीती वाटायची. मला माहीत नाही का, पण मी त्याला थोडी घाबरायचे. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. आता मात्र मी त्याला माझ्या कुटुंबातील व्यक्ती मानते.”
सलमान खान आणि ‘बिग बॉस’बद्दल काय म्हणाला कुणाल खेमू?
मुलाखतीदरम्यान कुणाल खेमूला त्याच्या ‘अलायंस’ या शोबद्दल तसेच सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोबद्दलही विचारण्यात आलं. नुकताच संपलेल्या ‘अलायंस’मध्ये कुणालने होस्टच्या भूमिकेत होता. या शोमध्ये सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. विशेष म्हणजे, शोदरम्यान सलमान भावाला भेटण्यासाठीही आला होता. मात्र, त्यावेळी कुणाल तिथे उपस्थित नव्हता.
कुणालला विचारण्यात आलं की, सलमान खान तुमच्या ‘अलायंस’ या शोमध्येही आला होता आणि आता ‘बिग बॉस’देखील सुरू होणार आहे. याबद्दल काय सांगशील? यावर कुणाल म्हणाला, “ते दिग्गज आहेत. त्यांना खूप अनुभव आहे. जेव्हा ते अलायंसमध्ये आले होते, तेव्हा दुर्दैवाने मी तिथे नव्हतो. त्यांची भेट झाली असती तर मला नक्कीच आनंद झाला असता. बिग बॉससाठी मी खूप उत्सुक आहे.”
‘वाइब’ हा एक अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याबरोबरच कुणाल खेमूने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. चित्रपटात कुणाल खेमू, प्रीती झिंटा, वंशिका धीर, यशपाल शर्मा, निरहुआ आणि स्पर्श श्रीवास्तव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
