Preity Zinta shares video with Bobby Deol: लोकप्रिय अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या अभिनयापासून दूर असली तरी बॉलीवूडमधील तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींशी आजही तसेच नाते आहे. प्रीती झिंटा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेते.

प्रीती झिंटाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने बॉबी देओलबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सोल्जर या सिनेमातील सीनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, चित्रपटातील महफिल में बार बार हे गाणे ऐकायला मिळत आहे. कुमार सानू व अलका याग्निक यांनी हे गाणे गायले आहे. प्रीती झिंटा व बॉबी देओल यांनी या सिनेमात एकत्र काम केले होते. आता अभिनेत्रीने पोस्ट शेअर करीत त्या सिनेमाच्या शूटिंगची आठवण सांगितली आहे.

प्रीती झिंटाने बॉबी देओलला टॅग करीत एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच, तिने लिहिले की, बॉबी देओल व त्याची पत्नी तान्या देओलच्या हनिमूनदरम्यान ती त्यांच्याबरोबर होती.

“त्याबद्दल मी तुझी कायम आभारी…

तिने लिहिले, “हे बघ बॉबी मला काय मिळाले. ऑस्ट्रेलियातील माझ्या पहिल्या आऊटडोअर शूटिंगला तू इतके मजेशीर बनवलेस, त्याबद्दल मी तुझी कायम आभारी राहीन.” पुढे तिने असेही लिहिले, “तुझ्या हनिमूनला मी तिथे होते. त्यामुळे तुमच्यातील तिसरी व्यक्ती होऊन मला खूप आनंद झाला.”

प्रीतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी सिनेमाचे कौतुक केले आहे. तर काहींनी लिहिले की, आता असे चित्रपट बनवणे बंद झाले आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

बॉबी देओलने ३० मे १९९६ रोजी तान्या आहुजाबरोबर लग्न केले. ती एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. द गुड अर्थ हा त्यांचा फर्निचर बिझनेस आहे. बॉबी व तान्याच्या लग्नानंतर सोल्जर या चित्रपटाचे शूटिंग झाले. १९९८ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात बॉबी देओल व प्रीती झिंटा प्रमुख भूमिकांत होते. हा सिनेमा सस्पेन्स, गाणी आणि जबरदस्त अॅक्शनसाठी प्रसिद्ध आहे.

सोल्जर या सिनेमात प्रीती व बॉबीबरोबरच राखी गुलजार, सुरेश ओबेरॉय, दिलीप ताहिल असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. त्यावेळी हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता.

दरम्यान, बॉबी देओल सध्या नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. आगामी काळात अभिनेता कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.