Preity Zinta on FDA commissioner Tukaram Mundhe: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. अन्न भेसळी विरोधात गेल्या काही महिन्यांपासून एफडीएकडून कारवाई तीव्र करण्यात येत आहे. छोट्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सपासून ते पंचतारांकित हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय फूड चेन आणि शतकाहून जुन्या आस्थापनांवर थेट धाडी टाकल्या जात आहेत. या सगळ्यामुळे सामान्यांना सुरक्षित, भेसळविरहित अन्नपदार्थांचा आस्वाद घेता येत आहे.

विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सामान्यांपासून ते अगदी मोठमोठे कलाकार, नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वजण तुकाराम मुंढे यांचे कौतुक करत आहेत. मनोज बाजपेयी यांनी एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले होते. तर अभिनेत्री देसी शाह, रवीना टंडन, सलमान खान, परेश रावल, ट्विंकल खन्ना या लोकप्रिय कलाकारांनीदेखील तुकाराम मुंढेचे कौतुक केले आहे.

प्रीती झिंटाचा तुकाराम मुंढेंना पाठिंबा

आता आणखी एका अभिनेत्रीने तुकाराम मुंढेंना पाठिंबा दर्शवला आहे. तिने तिच्या शर्टवर त्यांच्या टीममध्ये असल्याचे म्हणजेच त्यांच्या बाजूने असल्याचे लिहिले आहे. आता ही अभिनेत्री कोण आणि तिने तिच्या शर्टवर नेमकं काय लिहिलं आहे, याबद्दल जाणून घेऊ…

तुकाराम मुंढेंना पाठिंबा देणारी ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून प्रीती झिंटा आहे. सध्या प्रीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपील कारंडे यांच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की प्रीती पापाराझींना फोटोसाठी पोझ देत आहे. निळी जिन्स आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तिचा साधा लूक लक्षवेधी ठरला. कारण- तिच्या शर्टवर “टीम तुकाराम मुंढे”, असे लिहिले आहे. तिचा लूक आता चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या शर्टवरील टीम तुकाराम मुंढे असे लिहिल्याचे पाहून पापाराझींनी ते मोठ्याने वाचले. त्यावेळी प्रीती म्हणाली की ही वेळ या हिरोंना सेलिब्रेट करण्याची आहे. (Time to celebrate these heroes)

प्रीतीच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आगामी काळात मुंढे सरांवर बायोपिक येणार”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तुकाराम मुंढे साहेबांनी सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे”, आणखी एकाने लिहिले, “हे पाहून अभिमान वाटला”, एकाने लिहिले, “ही हजार कोटींची मालकीण असेल. पण, त्या माणसाची चाहती आहे जो नैतिकतेने आणि विचाराने हजार कोटीचा आहे. तुकाराम मुंढे साहेब”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, प्रीती झिंटा लवकरच व्हाईब या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.