Amitabh Bachchan Message To Prem Chopra : खलनायकाची भूमिका साकारूनही प्रेक्षकांची मनं जिंकलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते बरे होऊन घरी परतले आणि आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

प्रेम चोप्रा यांचा जावई आणि अभिनेता शर्मन जोशीने त्यांना स्टेनोसिस असल्याचं निदान झाल्याची माहिती दिली होती. प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीविषयी समजताच अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती. मात्र, या कलाकारांपैकी एक अभिनेते असे होते, जे प्रेम चोप्रांना बरे होण्यासाठी रोज एक खास मेसेज करत असत, हे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन.

१९७० आणि १९८० च्या दशकात या दोन्ही दिग्गज कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पडद्यावर प्रेम चोप्रा अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत असायचे, तर अमिताभ नायक असायचे. तेव्हापासूनची दोघांची मैत्री अजूनही टिकून आहे, त्यामुळेच प्रेम चोप्रा आजारी असताना अमिताभ बच्चन आपल्या लाडक्या मित्राला रोज एक खास मेसेज करायचे; याबद्दल स्वत: प्रेम चोप्रा यांनीच खुलासा केला आहे.

बिग बी प्रेम चोप्रांना करायचा ‘हा’ मेसेज

‘हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रेम चोप्रा यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन हे त्यांचे व्हॉट्सॲपवरील सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. त्यांच्या आजारपणात बिग बी दररोज त्यांना ‘लवकर बरे व्हा’ (Get Well Soon) असा मेसेज पाठवून त्यांची विचारपूस करत असत.

प्रेम चोप्रा म्हणाले, “मी आजारी पडल्यापासून अमिताभ रोज सकाळी मला मेसेज करायचे की, ‘प्रेम, लवकर बरा हो, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय.’ मी त्यांना म्हणालोसुद्धा की, ‘मित्रा, आता मी पूर्णपणे बरा झालो आहे’, पण तरीही ते प्रेमळ मेसेज पाठवत राहायचे.”

प्रेम चोप्रा वअमिताभ बच्चन यांचे चित्रपट

प्रेम चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांनी १९७० ते १९८० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामध्ये ‘दो अनजाने’ (१९७६), ‘द ग्रेट गॅम्बलर’ (१९७९), ‘बेनाम’ (१९७४), ‘मर्द’ (१९८५) आणि ‘नसीब’ (१९८१) अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.

प्रेम चोप्रा यांची यशस्वी कारकीर्द

प्रेम चोप्रा यांनी गेल्या ६ दशकांमध्ये ३८० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. ‘वो कौन थी’, ‘उपकार’, ‘कटी पतंग’, ‘बॉबी’, ‘त्रिशूल’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.