Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने नुकताच या सिनेमाचा ‘म्युझिक अल्बम लॉन्च’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. त्यामुळे चित्रपटातील गाणी सुद्धा त्याच अनुषंगाने चित्रित करण्यात आली आहेत. प्रत्येक गाणं ऐकताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून ए आर रेहमान यांनी जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय ‘छावा’मधील ‘आया रे तूफान’ हे गाणं सुप्रसिद्ध मराठी लेखक क्षितिज पटवर्धनने लिहिलं आहे. तर, या गाण्याला गायिका वैशाली सामंतचा आवाज लाभला आहे. एकंदर हिंदी कलाकारांच्या जोडीला असंख्य मराठी कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून संतोष जुवेकरने साकारलेल्या ‘रायाजी’ या पात्राची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. संतोषप्रमाणे सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर, नीलकांती पाटेकर असे बरेच मराठी कलाकार ‘छावा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. यांच्यामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्याचा समावेश आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नवीन मिहिका अर्थात अमृता बनेचा नवरा शुभंकर एकबोटे सुद्धा ‘छावा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. एवढ्या सुंदर चित्रपटात आपल्या पतीला भूमिका साकारण्याची संधी मिळाली यासाठी अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आनंदी आहे. ‘छावा’चा टीझर, ट्रेलर, गाणी या सगळ्या गोष्टींचं अमृताने भरभरून कौतुक केलं आहे. आता चित्रपट प्रदर्शनापूर्णी या जोडप्याने म्युझिक लॉन्च सोहळ्याला जोडीने उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे.

Chhaava Movie
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्री अमृता बने व अभिनेता शुभंकर एकबोटे ( Chhaava Movie )

दरम्यान, शुभंकर एकबोटे ( Chhaava Movie ) सिनेमात कोणती भूमिका साकारतोय याचा उलगडा १४ फेब्रुवारीलाच होणार आहे. ‘छावा’बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. या दोघांसह सिनेमात आशुतोष राणा, दिव्या दत्त, अक्षय खन्ना, डायना पेन्टी असे बरेच कलाकार झळकणार आहेत.

Story img Loader