मणिरत्नम यांच्या लोकप्रिय ‘दिल से’ (१९९८) या चित्रपटातून प्रीती झिंटाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर आधीपासूनच लोकप्रिय असलेली मनीषा कोईराला आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर जवळपास ३० वर्षांच्या कारकिर्दीत प्रीतीने अनेक हिट चित्रपट दिले आणि लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या, ज्यासाठी आजही तिचं कौतुक केलं जातं. ७ वर्षांच्या ब्रेकनंतर प्रीतीने सनी देओल आणि शबाना आझमी यांच्यासह ‘बंटवारा १९४७’मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. मात्र, या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही. आता ५१ वर्षीय प्रीती झिंटा ‘वाइब’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेता कुणाल खेमू याने केलं आहे.

‘वाइब’च्या ट्रेलर लॉन्चवेळी प्रीती झिंटाने प्रेक्षकांना तिच्या चित्रपटातून पदार्पण करणारी सहअभिनेत्री वंशिका धीरवर प्रेमाचा वर्षाव करण्याचं आवाहन केलं. ‘SCREEN’शी संवाद साधताना तिला विचारण्यात आलं की, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातही वंशिकासाठी ती जशी खंबीरपणे उभी राहिली, तसं तिची काळजी घेणारं किंवा तिला मार्गदर्शन करणारं कोणी होतं का? यावर प्रीतीने सांगितलं की, तिच्यासाठी मनीषा कोईराला नेहमीच खंबीरपणे उभी राहिली. तिने व शाहरुख खानने तिला त्यावेळी चांगली वागणूक दिल्याचं सांगितलं, मात्र बॉलीवूडमध्ये आपणही या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत, आपलं इथे स्वागत आहे अशी भावना निर्माण करण्याचं श्रेय तिने मनीषा कोईरालाला अधिक दिलं.

माधुरी खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागली – प्रीतीची माधुरीबद्दल प्रतिक्रिया

प्रीती झिंटा म्हणाली, “मी मनीषा कोईरालाबरोबर काम केलं आणि ती खूपच छान होती. अर्थात, पुरुष कलाकारही खूप चांगले होते पण महिलांकडून मिळणारा पाठिंबा काहीसा अधिक खास वाटतो. मी फक्त दोन-तीन चित्रपट केले होते, तेव्हाच मी माधुरी दीक्षितबरोबरही काम केलं होतं. ती तेव्हा मोठी स्टार होती आणि ती माझ्याशी खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागली.”

प्रीती पुढे म्हणाली, “शाहरुख खानने मला सेटवर खूप चांगली वागणूक दिली. कारण तो तेव्हा खूप मोठा स्टार होता. पण खरं सांगायचं तर मनीषानेच मला या इंडस्ट्रीचा एक भाग असल्यासारखी वागणूक दिली. त्याबद्दल मी तिची नेहमीच आभारी राहीन आणि ते कधीच विसरणार नाही. मला वाटतं, असे छोटे-छोटे क्षणही तुम्हाला खूप मोठं बळ देतात.”