Prithviraj Sukumaran Bollywood Secrets: दाक्षिणात्य अभिनेता व दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन हे लवकरच ‘दायरा’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दाक्षिणात्य व बॉलीवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे त्यांनी सिनेविश्वातील फरक सांगितला आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीकडून बॉलीवूडने काय शिकायला हवं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मल्याळम इंडस्ट्रीतील अनौपचारिक व थेट काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.
एक्सप्रेसो सेशनमध्ये (Expresso Session) मुलाखतीमध्ये पृथ्वीराज सुकुमारन यांनी बॉलीवूड व दाक्षिणात्य सिनेविश्वातील कामाच्या पद्धतीवर त्यांचे मत मांडले. पृथ्वीराज म्हणाले, “आमची इंडस्ट्री ज्या अनौपचारिक पद्धतीने काम करते, तीच आमची मोठी ताकद आहे. बॉलीवूडपेक्षा आम्ही खूप साध्या पद्धतीने काम करतो.”
मल्याळम सिनेमांचे वाढले बजेट – पृथ्वीराज
पुढे त्यांनी मल्याळम सिनेमा अजूनही कमी बजेटमध्ये आणि कमी दिवसांत तयार होतो, हा समजही चुकीचा असल्याचे सांगितले. पृथ्वीराज म्हणाले, “लोकांना अजूनही वाटतं की मल्याळम चित्रपट १५ दिवसांत आणि पाच कोटींच्या बजेटमध्ये बनतात. पण, आता तसे राहिलेले नाही. आता आम्हीसुद्धा मोठे बजेट असलेले सिनेमे करतो, ज्याचे शूटिंग १५० दिवसांपर्यंत चालते. अशा सिनेमांचं बजेट १०० कोटी रुपयांपर्यंत असतं.”

चित्रपटाचे प्रमाण व भव्यता वाढली असली तरी कामाची पद्धत तीच असल्याचे पृथ्वीराज सुकुमारन यांनी सांगितले. ते म्हणाले, “मल्याळम चित्रपटाचे बजेट आणि काम वाढले असले तरी इंडस्ट्रीतील काम करण्याची अनौपचारिक पद्धत मात्र आजही तशीच आहे. या दृष्टिकोनामुळेच आम्ही बनवलेले चित्रपट हे सध्याच्या वास्तवाशी जोडलेले वाटतात आणि त्यामध्ये एक मानवी स्पर्श जाणवतो.”

मल्याळममध्ये चित्रपट करायचा असेल तर…
बॉलीवूडमधील कलाकारांच्या कास्टिंगवरही पृथ्वीराज सुकुमारन यांनी मत मांडले. त्यांनी करीना कपूरचेच उदाहरण देत सांगितले की, “समजा जर मला दिग्दर्शक म्हणून करीनाबरोबर मल्याळममध्ये चित्रपट करायचा असेल तर मी तिला थेट फोन करून म्हणेन की, ‘मला तुमच्याबरोबर चित्रपट करायचा आहे, मी तुम्हाला स्क्रिप्ट सांगू का?’ यावर ती म्हणेल की, ‘मी सध्या प्रवास करतीये आणि एखाद्या दुसऱ्या दिवशी भेटू.'”
बॉलीवूडमध्ये एजन्सी, मॅनेजर अशा पद्धतीतून चालते काम – पृथ्वीराज
याउलट बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी आधी एजन्सीशी संपर्क साधावा लागतो; मग एजन्सी तुमच्यासाठी नेमलेल्या मॅनेजरशी बोलते आणि तो मॅनेजर तुम्हाला दिग्दर्शकाशी भेट घालून देतो. जेव्हा अभिनेता आणि दिग्दर्शक एकत्र काम करण्यास तयार होतात, तेव्हाच प्रॉडक्शन हाऊस व एजन्सी यांच्यात मानधनाबाबत चर्चा होते. एजन्सी मानधनाची एक रक्कम सांगते, प्रॉडक्शन हाऊस त्यातील निम्मी रक्कम सुचवते आणि मग वाटाघाटीला सुरुवात होते. बॉलीवूडमध्ये हे सगळे खूप कॉर्पोरेट पद्धतीचे आहे. ही पद्धत काम करते यात शंका नाही. पण मला वाटतं, एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा इतर सोपे मार्गही आहेत,” असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘दायरा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पृथ्वीराज सुकुमारन, करीना कपूर आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार हे ‘एक्सप्रेसो’च्या विशेष कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले होते. १८ सप्टेंबर रोजी ‘दायरा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
