Priya Bapat Bad Touch Experience in Hindi Movie Shooting : प्रिया बापट मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकेतही काम केलं आहे. अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून ओटीटीवरही सक्रिय आहे. प्रिया अनेकदा तिच्या या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसते. विविध भाषा आणि कलाकारांबरोबर काम करत असताना प्रियाने तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

प्रिया बापट, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी नुकतीच फिल्मफेअरला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांचे अनेक चांगले आणि वाईट अनुभव सांगितले आहेत. याचदरम्यान प्रियानेही तिला तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या सेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिच्या सहकलाकाराकडून तिला चुकीची वागणूक मिळाली होती आणि तिच्या सहअभिनेत्याने तिला शूटिंगदरम्यान चुकिच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं म्हटलं आहे. प्रिया नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…

प्रियाने सांगितला ‘तो’ वाईट अनुभव

मुलाखतीत प्रिया याबद्दल म्हणाली, “मराठीत असं घडलं नाही, पण मी माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी शूटिंग करत असताना घडलं. मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही.” यावेळी तिथे असलेल्या सई ताम्हणकरने “मला कदाचित माहीत आहे ती व्यक्ती” असं म्हटलं. प्रिया यावर “मी तुला सांगितलं होतं तुला माहीत आहे.” असं म्हणाली. प्रिया याबद्दल पुढे म्हणाली, “तो माझा पहिला हिंदी चित्रपट होतो. त्या चित्रपटात फक्त एकच किसिंग सीन होता आणि दिग्दर्शकाला सातत्याने विचारत होते की का तुम्हाला हा सीन हवा आहे कारण मला त्या सीनची तिथे गरज वाटत नव्हती. पण, ते खूप आग्रह करत होते म्हणून मी म्हटलं ठिक आहे.”

प्रिया पुढे म्हणाली, “मी एकाच किसिंग सीनसाठी होकार दिला होता. पण त्यानंतर असे काही क्षण होते जिथे तो सहअभिनेता मला किस करतच राहिला आणि मला माहीत नाही का पण मी स्वत:साठी त्यावेळी ठाम भूमिका घेतली नाही. कारण मला माहीतच नव्हतं की मी काय करायला हवं. आम्ही एकाच हॉटेलमध्ये पण, वेगळ्या रूममध्ये राहत होतो पण, तो मला मॅसेज करत होत की आपण बाहेर जाऊयात, एकत्र डिनर करुयात, तू इकडे ये मी तुला स्वीम करायला शिकवतो, आपण भेटू शकतो का? मी म्हटलं मला यातलं काहीही नको आहे. असं पूर्वी कधीच माझ्याबरोबर घडलं नव्हतं आणि घडूही नये.”

उमेशने दिलेली खंबीर साथ

प्रिया हा अनुभव सांगत पुढे म्हणाली, “त्यावेळी या परिस्थितीत कसं वागावं मला कळलं नाही. भोपाळमध्ये शूटिंग करत होतो. मी उमेशला दररोज रात्री फोन करायचे. आम्ही आधीच हा नियम बनवला होता की दोघे कधीही एकमेकांच्या सेटवर जाणार नाही. पण तो एकमेव सेट होतो जिथे तो आलेला. मी त्याला सांगितलं नव्हतं पण, तो मुंबईहून भोपाळला आलेला आणि तीन दिवस माझ्याबरोबर होता जेणेकरुन त्या सहअभिनेत्याला त्याच्या मर्यादा कळतील.”

प्रियाला पुढे त्याने कुठले सीन कट केले का मग असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही. उलट त्याला माझ्याबरोबर अजून सीन हवे होते. सीनमध्ये जरी फक्त मिठी मारयची वगैरे असेल आणि ते कॅमेऱ्यावर जरी चांगलं दिसत असलं तरी प्रत्येक्षात तुम्हाला जाणवतं की तो स्पर्श चुकीचा आहे आणि मला ते माहीत होतं. म्हणून जेव्हा मला पुढे जाऊन कळलं की सईसुद्धा त्याच्याबरोबर काम करणार आहे तेव्हा मी तिला फोन करुन माहिती देऊन सावध राहायला सांगितलं.