दिवंगत दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान उर्फ टायगर पतौडी यांचे मोठे चाहते असलेले दिग्दर्शक प्रियदर्शन आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता सैफ अली खानबरोबर ‘हैवान’ या आगामी चित्रपटात काम करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शन यांनी टायगर पतौडी यांना भेटण्यासाठी केलेल्या अनेक प्रयत्नांचा किस्सा सांगितला. त्यांना भेटण्याच्या प्रयत्नात एकदा त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापतही झाली होती. असंही सांगितलं आहे.

प्रियदर्शन यांनी ‘हैवान’च्या सेटवर सैफबरोबर त्याच्या वडिलांबद्दल झालेल्या चर्चेचाही खुलासा केला. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात अक्षय कुमार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टशन’नंतर तब्बल १८ वर्षांनी सैफ आणि अक्षय पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.

प्रियदर्शन यांनी सांगितला टायगर पतौडींना भेटण्याचा किस्सा

न्यूज१८शी संवाद साधताना प्रियदर्शन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार टायगर पतौडी यांना भेटण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “मला आठवतंय, ते युनिव्हर्सिटी स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफीचा सामना खेळत होते. ते हैदराबादकडून खेळत होते. मला त्यांना शोधून भेटायचं होतं. त्यामुळे मी पूर्ण ताकदीने धावत गेलो आणि जोरात पडलो”. दिग्दर्शक पुढे म्हणाले, “मला खूप मोठी दुखापत झाली आणि त्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही. नंतर मला आठवतंय की, वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईमध्ये त्यांना खेळताना पाहिलं होतं. त्यावेळी गारफिल्ड सोबर्स यांच्या नेतृत्वाखालील संघ भारताविरुद्ध खेळत होता. याच सामन्यात फारुख इंजिनिअर यांनी शतक झळकावलं होतं. त्यावेळी मी नुकतंच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती”.

‘हैवान’च्या सेटवरही सैफचे दिवंगत वडील टायगर पतौडी यांच्याबद्दल अनेकदा चर्चा व्हायची. प्रियदर्शन म्हणाले, “सेटवर मी सैफबरोबर टायगर पतौडींबद्दल खूप चर्चा करायचो. त्यांच्या कारकिर्दीतील सर्व धावा मला आठवतात. सैफने माझ्यासाठी सही केलेलं एक पुस्तकही मी जपून ठेवलं आहे. ते पुस्तक टायगर पतौडींबद्दलच होतं”.

सैफने सांगितलं टायगर पतौडी आणि प्रियदर्शन यांच्यातील साम्य

गेल्या आठवड्यात हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने त्याचे वडील टायगर पतौडी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यातील एक खास साम्य सांगितलं. तो म्हणाला, “ते मला माझ्या वडिलांची आठवण करून देतात. दोघेही क्रिकेटपटू आहेत आणि दोघांच्याही एका डोळ्याला जखम झाल्याने त्यांनी एक डोळा गमावला आहे. मात्र, आपल्या-आपल्या क्षेत्रात दोघेही उत्तम आहेत”.

मन्सूर अली खान पतौडी यांना १९६१ मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातानंतर उजव्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती. या अपघातात काचेचा एक तुकडा त्यांच्या उजव्या डोळ्यात घुसला आणि त्यामुळे डोळ्याला कायमस्वरूपी नुकसान झालं. डोळ्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पतौडी यांना दुहेरी दृष्टीचा (डबल व्हिजन) त्रास होऊ लागला होता.

त्याचप्रमाणे, प्रियदर्शनही वयाच्या विशीत राज्यस्तरीय क्रिकेट खेळत असताना जखमी झाले होते. त्यांना व्यावसायिक क्रिकेटपटू व्हायचं होतं; मात्र मैदानावर झालेल्या एका मोठ्या अपघातामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. क्रिकेटच्या चेंडूचा डाव्या डोळ्याला जोरदार फटका बसल्याने त्यांना क्रिकेट सोडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळावं लागलं. त्यानंतर प्रियदर्शन यांनी ९९ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून, ‘हैवान’ हा त्यांच्या कारकिर्दीतील ९९वा चित्रपट आहे.