Priyadarshan on Hera Pheri 3: गेल्या काही आठवड्यांपासून ‘हेरा फेरी ३’ बद्दल विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. बऱ्याच वर्षांनी हा चित्रपट येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल कोणते ना कोणते वाद सुरू आहेत. अशातच आता दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शनातून माघार घेतली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाभोवती असलेल्या कायदेशीर वादांमुळे हा चित्रपट कधीच रिलीज होऊ शकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. आता प्रियदर्शन यांनी पुन्हा एकदा या वादावर भाष्य करत निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

निर्मात्यांनी गेल्या काही वर्षांत अनेकदा आपला अपमान केला आहे, असा आरोप प्रियदर्शन यांनी ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत केला. “फिरोजने अक्षयला कुमारला सांगितलं होतं की, ‘तुझ्याकडे हेरा फेरी ३ बनवण्याचे हक्क आहेत, पण प्रियदर्शनबरोबर हा चित्रपट कधीच बनवू नकोस, एवढीच माझी विनंती आहे.’ त्याने अनेकदा माझा अपमान केला आहे. त्याने मला म्हटलं होतं की माझा ‘हेरा फेरी’ चित्रपटाचा कट एका गरीब माणसाने बनवलेल्या चित्रपटासारखा दिसत होता आणि त्याला माझा पाच तासांचा चित्रपट एडिट करावा लागला होता.”

“मी हा चित्रपट धुरंधरपेक्षाही मोठा बनवू शकलो असतो”

प्रियदर्शन यांनी सांगितलं की त्यांनी सुरुवातीला ‘हेरा फेरी ३’ चे दिग्दर्शन करण्यास होकार दिला होता, कारण त्यांच्या मते या फ्रँचायझीमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी फ्रँचायझी बनण्याची क्षमता होती. प्रियदर्शन म्हणाले, “मी सुरुवातीला अक्षयबरोबर तिसरा भाग करण्यास तयार झालो होतो, कारण मला वाटले की मी देशातील सर्वात मोठ्या फ्रँचायझींपैकी एक चित्रपट बनवू शकेन. जर मी याचं दिग्दर्शन केलं असतं, तर मी हा चित्रपट ‘धुरंधर’पेक्षाही मोठा बनवला असता. अक्षय, सुनील आणि परेश यांनी मला ‘हेरा फेरी ३’ बनवण्याची विनंती केली होती. मी त्यांना कथा ऐकवल्यावर ते सर्वजण खूप उत्सुक होते.”

‘हेरा फेरी ३’ कधीच रिलीज होऊ शकणार नाही – प्रियदर्शन

मागच्या महिन्यात निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी जाहीर केलं होतं की आता प्रियदर्शन आता या चित्रपटाशी जोडलेले नाहीत. नंतर स्वतः प्रियदर्शन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना म्हणाले, “फिरोज जे म्हणाला ते खरंय. मी ‘हेरा फेरी ३’ मध्ये नाहीये. माझ्या माहितीनुसार, अनेक कायदेशीर अडचणी आणि वैयक्तिक वादविवादांमुळे ‘हेरा फेरी ३’ कधीच रिलीज होऊ शकणार नाही. त्यात मी असेन की नाही हे महत्त्वाचं नाही.”