‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कॉमेडी चित्रपट आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाल्यानंतर आजही चित्रपटांची क्रेझ कायम असून यातील संवाद, सीन आणि अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल यांच्यातील केमिस्ट्री आजही अनेकांना आवडते आणि आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यात कमी पडत नाही. पण या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मात्र आता या चित्रपटाबद्दल बोलताना या चित्रपटामुळे ते खूप त्रस्त झाले होते असं वक्तव्य केलं आहे.

प्रियदर्शन यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात गंभीर आशयाच्या चित्रपटांमधून केली. मात्र, २०००च्या दशकात त्यांनी आपल्या दर्जेदार आणि विनोदी चित्रपटांमुळे वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे प्रियदर्शन यांना कॉमेडी चित्रपट बनवणं आवडत नाही, हे ऐकून आश्चर्य वाटू शकतं. ‘हैवान’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरमधील चित्रपट करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

प्रियदर्शन यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं नाव ‘मुस्कुराहट’ होतं आणि हा एक गंभीर आशयाचा चित्रपट होता. मात्र, ‘गर्दिश’ या चित्रपटामुळे त्यांना बॉलीवूडमध्ये मोठं यश मिळालं. त्यानंतर ‘विरासत’ हा चित्रपटही यशस्वी ठरला. मात्र, त्यानंतरचे काही चित्रपट फारशी छाप पाडू शकले नाहीत. अखेर २००० मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ने त्यांचं हिंदी सिनेमातील करिअरच बदलून टाकलं. या विनोदी चित्रपटामुळे प्रियदर्शन यांचं करिअर तर बदललंच, शिवाय त्यांची प्रतिमाही बदलली.

हेरा फेरीमुळे मी त्रस्त झालो – प्रियदर्शन

याबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले, “मी गंभीर आशयाच्या चित्रपटांपासून सुरुवात केली. गर्दिश माझ्यासाठी यशस्वी ठरला, विरासत ही यशस्वी झाला. त्यानंतर हेरा फेरीमुळे मी खूप त्रस्त झालो. त्यानंतर फक्त कॉमेडी, कॉमेडी आणि कॉमेडीच मिळत राहिली. खरं सांगायचं तर, मला कॉमेडी चित्रपटांचं शूटिंग करणं अजिबात आवडत नाही”.

दरम्यान, प्रियदर्शन सध्या त्यांच्या ‘हैवान’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अक्षय कुमार सैफ अली खान हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. अक्षय कुमार यामध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे तर सैफ अली खान एका अंध व्यक्तीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.