Priyadarshan on Comedy Movies: ‘हेरा फेरी’, ‘भुल भुलैया’ आणि ‘हंगामा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक प्रियदर्शन भारतीय चित्रपटसृष्टीतील कॉमेडी चित्रपटांचे बादशाह मानले जातात. पण आता मात्र आपण कॉमेडी चित्रपट बनवायला घाबरत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. प्रियदर्शन यांच्यासारखे विनोदी चित्रपट बनवणारे इंडस्ट्रीत फार कमी लोक आहेत. चार दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी डझनभर कॉमेडी सिनेमे बनवले. ते सिनेमे आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. मात्र, आता आपल्याकडे विनोदाच्या नव्या कल्पना संपल्या आहेत, अशी काळजी त्यांना वाटते.

प्रियदर्शन यांच्या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. त्यांचे जुने चित्रपट वीकेंडला पाहणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. या चाहत्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. त्यालाही त्यांचे चित्रपट खूप आवडतात. ‘पिंकविला’शी बोलताना प्रियदर्शन म्हणाले, “खरं सांगायचं झाल्यास, आता मला गंभीर चित्रपट बनवायला आवडतात. मला आता कॉमेडी चित्रपट बनवण्यात रस नाही; पण मला कॉमेडी चित्रपट बनवण्यासाठी भाग पाडलं जातंय. मला वाटतं की माझ्या कल्पना आता संपल्या आहेत. मला जुन्याच गोष्टी पुन्हा करायच्या नाहीत. मी अजून एक कॉमेडी चित्रपट बनवीन आणि मग थांबेन.”

विराट कोहली पाहतो ‘हा’ फ्लॉप चित्रपट

‘ढोल’ (२००७) आणि ‘खट्टा मिठा’ (२०१०) हे चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यांच्या अपयशाने मानसिक धक्का बसला होता, पण आता हे चित्रपट ओटीटीवर लोकप्रिय होत असल्याचा प्रियदर्शन यांना आनंद होतोय. ते म्हणाले, “मला हे दोन्ही चित्रपट खूप आवडले होते, पण ते चित्रपटगृहात चालले नाहीत. ओटीटीमुळे आता लोक हे चित्रपट पाहतात. जेव्हा मी ‘ढोल’ बनवला होता, तेव्हा तो खूप चालेल असं मला वाटलेलं. आता जेव्हा विराट कोहलीसारखे लोक सांगतात की ते सामन्यापूर्वी रिलॅक्स होण्यासाठी ‘ढोल’ पाहतात आणि त्यातील डायलॉग्स एकमेकांना ऐकवतात, तेव्हा मला खूप आनंद होतो.”

प्रियदर्शन-विराट कोहलीने एकत्र केलेलं काम

विराट कोहलीने जाहीरपणे याबद्दल भाष्य केलेलं नाही. मात्र प्रियदर्शन आणि विराट यांनी पूर्वी एकत्र काम केलंय. आयपीएलमधील ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू’ची एक जाहिरात प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केली होती. त्यात विराट कोहली, ख्रिस गेल आणि शेन वॉटसन होते. त्यावेळी विराटच्या अभिनयाने प्रियदर्शन प्रभावित झाले होते. विराटने भविष्यात अभिनयात नशीब आजमावायला हवं, असंही ते म्हणाले होते.

‘मॅशबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘ढोल’च्या अपयशाबद्दल सांगितलं होतं. “बॉलीवूडचा मला एका गोष्टीबद्दल खूप राग येतो, ती म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या स्टारला न घेता चित्रपट करत असाल तर त्याला हवं तसं यश मिळत नाही. खूप काळानंतर लोक त्या चित्रपटाचं कौतुक करतात, हे निराशाजनक आहे. ‘ढोल’ आता एक कल्ट चित्रपट बनला आहे,” असं प्रियदर्शन म्हणाले होते. त्यांनी ‘मालामाल विकली’चं उदाहरण देत म्हटलं होतं की कोणताही मोठा सुपरस्टार नसतानाही तो चित्रपट तुफान चालला होता.