Priyadarshan slams rumours:काही दिवसांपूर्वीच ‘भूत बंगला’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने आतापर्यंत भारतात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे.

प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार, तब्बू, वामिका गब्बी, मिथिला पालकर, असरानी, राजपाल यादव,परेश रावल हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या हॉरर कॉमेडी सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

‘भूत बंगला’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री तब्बू व अक्षय कुमार २५ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. याचे कारणही या कलाकारांनी सांगितले होते. ते म्हणाले होते, आम्हाला तशी स्क्रिप्ट किंवा चित्रपट मिळाला नव्हता. एकत्र काम करण्यासाठी ‘भूत बंगला’ हा सिनेमा योग्य वाटला.

आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे कलाकार चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील तब्बूचे काही सीन कापले आहेत, त्यामुळे तब्बू नाराज आहे अशा चर्चा होत आहे. आता यावर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी वक्तव्य केले आहे.

प्रियदर्शन यांनी नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तब्बूचे चित्रपटातील सीन कमी केलेत, कापले आहेत याबद्दल ते म्हणाले, “अशा नकारात्मक गोष्टी कोण आणि का पसरवत आहे हे मला माहीत नाही. मी चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. मी ठरवतो की चित्रपटात काय ठेवायचे आणि काय नाही. हा चित्रपट यशस्वी ठरत आहे. पण, तरीही काहीजण त्याबद्दल नकारात्मकता पसरवत आहेत. तब्बू अजिबात नाराज नाही. मी तिच्याबरोबर आठ चित्रपटांत काम केले आहे. जर ती नाराज असेल तर तिने मला सांगितले असते. ती आनंदी आहे. तिने जे काही शूटिंग केले आहे, ते सिनेमात दाखवले आहे.”

असेही म्हटले जात होते की, अक्षय कुमार जास्त दिसला पाहिजे म्हणून त्याच्या सांगण्यावरून चित्रपटातील तब्बूचे सीन कमी करण्यात आले आहेत. यावर प्रियदर्शन म्हणाले, “अक्षयने कोणताही पार्ट एडिट करा असे सांगितले नाही. तो तसे कधीच करत नाही. मी माझे काम प्रामाणिकपणे करतो. प्रत्येक कलाकार सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्याचा चित्रपट पाहतो. जे कोणी या अफवा पसरवत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे.”

याआधी मिड-डे रिपोर्टला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी तब्बूच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, “तब्बू १९९७ ला प्रदर्शित झालेल्या ‘विरासत’मध्ये जितकी सुंदर दिसली होती, तशीच ती आजही दिसते. ‘भूत बंगला’ सिनेमात तब्बूच्या भूमिकेशिवाय स्टोरी पुढे जाऊ शकत नाही.”

तब्बू व प्रियदर्शन यांनी १९९६ ला प्रदर्शित झालेला ‘कालापानी’, १९९७ ला प्रदर्शित झालेला ‘विरासत’ तसेच, २००० ला प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ सिनेमांत एकत्र काम केले आहे.

दरम्यान, आता आगामी काळात ‘भूत बंगला’ सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.