Priyadarshan Compares Dhurandhar With Bhoot Bangla : सध्या ‘धुरंधर २’ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. डिसेंबरमध्ये चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चित्रपटानं जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला आणि अनेक रेकॉर्ड मोडले. असंच काहीसं चित्र ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतरही पाहायला मिळतंय. चित्रपटाला प्रदर्शित होऊन आठवडाही झालेला नाहीये; पण, सिनमानं कोट्यवधींचं कलेक्शन केलं आहे.
प्रेक्षकांसह अनेक कलाकारही चित्रपटाचं कौतुक करीत आहेत. अशातच आता दाक्षिणात्य इंडस्ट्री ते बॉलीवूडमधील सर्व जण आदित्य धर व रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’चं कौतुक करीत असताना लोकप्रिय दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘धुरंधर’बद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांनी त्यांच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटाबद्दलही यावेळी सांगितलं आहे. प्रियदर्शन ‘धुरंधर’बद्दल नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…
‘धुरंधर २’चं काही जण खूप कौतुक करत आहेत; तर काही जण यावर टीकाही करत आहेत. परंतु, कौतुक करणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. अशातच आता दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी ‘धुरंधर २’ मुलांना दाखविण्यासारखा चित्रपट नसल्याचं म्हटलं आहे. तर त्यांचा आगामी ‘भूत बंगला’ सिनेमा पाहायला जाताना पालक त्यांच्या मुलांनाही बरोबर नेऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
१० एप्रिल रोजी प्रियदर्शन यांचा भूत बंगला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार त्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. अशातच आता या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक पीटीआयशी संवाद साधताना म्हणाले की, त्यांना चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसची काळजी नाहीये. ‘धुरंधर २’ची क्रेझ पाहता, त्याचा परिणाम ‘भूत बंगला’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होईल का विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
प्रियदर्शन नेमकं काय म्हणाले?
दिग्दर्शक म्हणाले, “मला वाटतं, आमच्या चित्रपटाची व्याप्ती मोठी आहे आणि लोकांना वेगळं काहीतरी पाहायला आवडतं. हेच ‘भूत बंगला’चं सर्वांत मोठं बलस्थान आहे.” प्रियदर्शन पुढे म्हणाले, “हा पूर्णपणे मनोरंजनाच्या दृष्टीने बनवलेला चित्रपट आहे. ‘बॉर्डर’ किंवा ‘धुरंधर’सारखा इंटेन्स चित्रपट नाहीये. लोकांना विविध जॉनरचे चित्रपट आवडतात. मला असं वाटतं की, जोवर लोकांना चित्रपटामध्ये रस आहे आणि ते इच्छुक आहेत, तोवर चित्रपट चालतो.”
‘भूत बंगला’चा यूएसपी काय आहे, असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन येऊ शकतात आणि हा चित्रपट दाखवू शकतात. माझ्या चित्रपटात मी कधीच दुहेरी अर्थ असलेले शब्द वापरत नाही किंवा पालकांना संकोच वाटेल, असं त्यात काहीच नसतं. मी माझ्या करिअरची सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवसापासून या गोष्टीची काटेकोरपणे काळजी घेत आहे.”
