Priyanka Chopra on gender inequality in household chores : बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता हॉलीवूडमध्ये करिअर घडवत आहे. महिलांच्या हक्कांबाबत अनेकदा ती स्पष्ट व ठाम भूमिका मांडताना दिसते. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकतेच घरकामांबाबत मत व्यक्त केले. घरातील कामे करणे ही फक्त स्त्रीची जबाबदारी नसल्याचे स्पष्ट मत प्रियांकाने मांडले आहे. आजही घरातील स्वयंपाक आणि धुणी-भांडी ही कामे प्रामुख्याने महिला करताना दिसून येतात. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियांकाने ही जीवनावश्यक गोष्ट असून, प्रत्येकाने ती केली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.

कान्स लायन्समध्ये बोलताना, अभिनेत्री प्रियांका चोप्राने घरगुती कामांबाबत असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य केले. प्रियांका चोप्रा म्हणाली, “अनेक घरांमध्ये स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आणि घरातील कामे सांभाळणे यांसारखी दैनंदिन कामे अजूनही महिला करतात. आजही घरातील कामे ही स्त्रियांचीच मानली जातात. साफसफाई आणि स्वयंपाक करणे ही फक्त स्त्रियांची कामे नाहीत. एक जबाबदार व्यक्ती म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष असा भेद आणि कामाचा आळस या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्या दोन्ही एकत्र करण्याची चूक करू नका,”

घरातील कामांबाबत प्रियांका चोप्राचे स्पष्ट मत

या चर्चेमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने समाजातील बदलत्या विचारसरणीबाबत भाष्य केले. घरातील कामांची जबाबदारी केवळ महिलांवर टाकणाऱ्या पारंपरिक विचारांमधून बाहेर पडण्याची गरज असल्याचे तिने सांगितले. तिच्या मते, घरातील कामे ही प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत आणि ही कामे लिंगभेदाचे निकष लावून विभागली जाऊ नयेत. घरातील जबाबदाऱ्या या स्त्री-पुरुषांनी समानपणे पार पाडल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत प्रियांकाने व्यक्त केले.

कल्पना सुचली तर लगेच शूट करा – प्रियांका

याच मुलाखतीमध्ये, प्रियांका चोप्राने संपूर्ण जगामध्ये सिनेमा व कथानक कसे विकसित होत आहे आणि बदलत आहे यावरही चर्चा केली. तिने हॉलीवूडच्या ‘ऑब्सेशन’ या चित्रपटाच्या यशाकडे लक्ष वेधले आणि नमूद केले की, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आशयनिर्मिती अधिक सुलभ झाली आहे, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना कथा सांगता येत आहेत. ती म्हणाली, “पूर्वी जर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात यायचे असेल, तर कोणत्या विभागात काम करायचे आहे हे ठरवावे लागायचे. या इंडस्ट्रीत प्रवेश करणे खरोखरच खूप कठीण होते; पण आता खूप सोपे झाले आहे. जर तुम्हाला एखादी कल्पना सुचली, तर तिचे शूटिंग करा आणि यूट्यूबवर अपलोड करा. कदाचित त्यातून ‘ऑब्सेशन’ (Obsession)सारखा चित्रपट साकारू शकतो,”

प्रियांका पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटात झळकणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या केवळ बॉलीवूडच नव्हे, तर हॉलीवूडमध्येही तिची वेगळी ओळख निर्माण करत आहे. लवकरच ती हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसोबत एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा असून, या प्रोजेक्टबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याशिवाय अनेक वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एकदा मोठ्या बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ चित्रपटात ती महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.