Priyanka Chopra teaching Durga Mantra to Malti Marie : बॉलीवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. यामधून ती लवकरच बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असून या चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रियांका तिच्या कुटुंबासह भारतात येते. अनेकदा ती तिची मुलगी मालती मेरीला भारतीय संस्कृतीची आणि परंपरांची ओळख करून देत असते. सध्या सोशल मीडियावर प्रियांकाने तिचा मालतीसह देवीचे स्त्रोत्र म्हणणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनसबरोबर लग्न करून परदेशात संसार थाटला असला तरी ती भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. प्रियांका तिच्या मुलीवरही हेच संस्कार करताना दिसून येते. मालती मेरी कधी आईबरोबर पूजा करताना दिसून येते तर कधी भारतीय सण-उत्सव आनंदाने साजरा करताना दिसून येते. प्रियांका भारतात आल्यानंतर मालतीला येथील विविध गोष्टी आणि संस्कृती दाखवून देत असते. सध्या प्रियांका ही तिच्या चार वर्षांच्या मालती मेरीला देवीचा मंत्र म्हणायला शिकवत आहे.

प्रियांकाने मालतीला शिकवला ‘हा’ श्लोक

प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती चार वर्षांची लेक मालती मेरीला प्रेमाने जवळ घेताना दिसत आहे. यावेळी प्रियांका मुलीला मंत्र म्हणायला शिकवत आहे. प्रियांका चोप्रा मालती मेरीला ‘दुर्गा सप्तशती’मधील काही मंत्रही शिकवत असल्याचं दिसून येत आहे. प्रियांकानंतर मालतीदेखील ‘सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते…’ असा श्लोक म्हणत आहे. मालती आणि प्रियांकामधील हा खास क्षण नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

नेटकऱ्यांनी केलं प्रियांकाचं कौतुक

या व्हिडीओमध्ये प्रियांकाने तिच्या आयुष्यातील दोन बाजू दाखवल्या आहेत. एका व्हिडीओमध्ये ती आई म्हणून मालतीची काळजी घेत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती नाचून तिचं आयुष्य एन्जॉय करत आहे. प्रियांकाने ‘माझी ही दोन व्यक्तिमत्त्व’ अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्राच्या या पोस्टवर कोकणहार्ट गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर हिने रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘तू दोन्ही जबाबदाऱ्या योग्यरितीने पार पाडत आहेस,’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, ‘तू कधीच तुझी भारतीय संस्कृती विसरत नाही.’

प्रियांका चोप्रा ‘वाराणसी’मधून करणार कमबॅक

प्रियांका चोप्रा ही अनेक वर्षांनंतर भारतीय सिनेमामध्ये झळकणार आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. एस एस राजमौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू असून या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती कुटुंबासह भारतात येत आहे. प्रियांका चोप्रा ही तिची मुलगी मालती मेरीला आपल्या देशाच्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख करून देत असते. काही दिवसांपूर्वी मालती ही टीव्हीवर प्रियांकाच्या ‘गुंडे’ या बॉलीवूड चित्रपटातील गाणं बघत असल्याचा फोटो प्रियांकाने शेअर केला होता. यानंतर आता प्रियांका मालतीला देवीचा श्लोक शिकवत असल्याचं दिसून येत आहे.