Priyanka Chopra Daughter Malti Marie: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने आता हॉलीवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली असली तरी तिचा भारतामध्ये मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये तिने एकाही हिंदी सिनेमामध्ये काम केले नसले तरी तिची क्रेझ कमी झालेली नाही. प्रियांकाच्या गाण्याची आणि चित्रपटांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. यानंतर आता प्रियांकाची लहान मुलगी मालती मेरी ही सुद्धा तिच्या बॉलीवूड सिनेमांची चाहती झाली असून प्रियांकाने चिमुकल्या मुलीचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात असून तिचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकासोबत तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीही भारतात दाखल झाली आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘वाराणसी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती भारतात आल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालती मेरी टीव्हीवर प्रियांकाच्या बॉलीवूड चित्रपटातील गाणं पाहताना दिसत असून, या गोंडस क्षणाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रियांकाने शेअर केला मुलगी मालतीचा खास फोटो

प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिची मुलगी मालती मेरी ही टीव्हीसमोर पाठमोरी बसलेली दिसत आहे. मालती ही टीव्हीमध्ये तिची आई प्रियांका चोप्राचे गाणे बघताना दिसून येत आहे. मालती ही प्रियांकाच्या ‘गुंडे’ या सिनेमातील ‘तुने मारी एन्ट्रीयाँ’ हे गाणे बघत आहे. चिमुकली मालती ही तिच्या आईचे बॉलीवूडमधील गाणे बघत असल्याने प्रियांकाने कौतुकाने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला प्रियांकाने, “कोणी असा विचार केला असेल?” असं भावनिक कॅप्शन देत रेड हार्ट इमोजी दिले आहे. तसेच या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने पती निक जोनसलाही टॅग केलं आहे.

मधु चोप्राचा नातीबरोबर निवांत वेळ

यानंतरच्या स्टोरीमध्ये प्रियांकाने मालती आणि तिची आजी मधु चोप्रा यांच्यातील एक गोड क्षण शेअर केला आहे. आजी-नातीची ही जोडी टेरेसवर एकत्र फिरताना आणि एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवताना दिसत आहे. आजीचा हात पकडून मालती फिरत असल्याचे दिसून येत आहे. प्रियांका ही सध्या तिच्या कुटुंबासह भारतामध्ये आली असून याचे खास क्षण ती सोशल मीडियावर शेअर करीत आहे.

प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम स्टोरी

प्रियांका चोप्रा लवकरच वाराणसी सिनेमात झळकणार

प्रियांका चोप्रा ही आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय सिनेमामध्ये झळकणार असल्याने तिचा हा भारत दौरा शूटिंगसाठी असल्याचे बोलले जात आहे. एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटातून भारतीय सिनेसृष्टीत ती पुनरागमन करत आहे. महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या भव्य ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटात प्रियांका ‘मंदाकिनी’ ही भूमिका साकारणार आहे. सुमारे १,००० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटात ‘टाइम ट्रॅव्हल’ पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक समोर आला होता, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ॲक्शन सीन करताना दिसून आली. ‘वाराणसी’ सिनेमाचे सध्या शूटिंग सुरू असून एप्रिल २०२७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.