Priyanka Chopra Bag Essentials : प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि त्यामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. अभिनेत्री अनेकदा मुलाखतींमधूनही मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसते. अशातच आता तिने तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार प्रियांका चोप्रा हिने २०१९ मध्ये सांगितलं होतं की ती तिच्या पर्समध्ये छोट्या टबॅस्को सॉसचं बाटली ठेवते. हे कळताच तिचे चाहते खूप उत्साहित झाले होते. आता ‘वोग’शी संवाद साधताना तिने पुन्हा एकदा तिच्या बॅगेत काय काय असतं याबद्दल सांगितलं आहे. प्रवास करताना आणि इतरवेळीसुद्धा तिच्या पर्समध्ये नेमकं काय असतं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
प्रियांकाच्या बॅगेत असतात ‘या’ गोष्टी
मुलाखतीत प्रियांकाने प्रवास करताना ती तिच्या बॅगेत नजर लागू नये म्हणून काळा दोरा, हनुमान चालीसा आणि इतर काही वस्तू ठेवते असं सांगितलं. त्यानंतर तिने तिचं वॉलेट उघडलं आणि २०१८ मधील निक जोनसबरोबरचा तिचा पहिला फोटो दाखवला, जो ती नेहमी तिच्याजवळ ठेवते.
प्रियांका पुढे म्हणाली, “आणि हा माझा Tide pen (डाग काढण्यासाठी) मी तो नेहमी बरोबर ठेवते. महागडे कपडे खराब होऊ नये यासाठी मी तो नेहमी माझ्याकडे ठेवते. ‘गोल्डन ग्लोब्स’मध्ये Dior चा ड्रेस घातला होता, पण पिझ्झा खाताना त्यावर डाग लागला. तेव्हा मी लगेच हा पेन वापरला आणि सगळं ठीक झालं,”
कॅमेऱ्यासमोर हनुमान चालीसाचं छोटंसं पुस्तक दाखवत प्रियांका म्हणाली, “ही माझी हनुमान चालीसा आहे. रोज हनुमान चालीसा म्हणायची असते. मी रोज म्हणत नाही, पण शक्य तितकी म्हणण्याचा प्रयत्न करते आणि मला असंही वाटतं की ती माझ्या प्रवासात माझं संरक्षण करते.”
प्रियांका पुढे बॅगेतला लेबल लावलेला पोर्टेबल चार्जर दाखवत म्हणाली, “यावर लेबल आहे, म्हणजे गडबडीत तो हरवणार नाही किंवा कोणी घेऊन जाणार नाही. मी सगळ्याच वस्तूंवर लेबल लावते ड्रॉवर, कपाट, सगळं काही. कारण नाहीतर माझा नवरा ते त्याच्या बॅगेत टाकतो.”
तिच्या बॅगेतील नवीन वस्तू दाखवत प्रियांका म्हणाली, “यावर्षी मला अॅलर्जी झाली आहे. त्यामुळे हा Epi-Pen आता माझ्या बॅगेतला नवीन पण खूप महत्त्वाचा भाग आहे. मला नेमकी कशाची अॅलर्जी आहे ते सांगू शकत नाही, कारण मग सगळ्यांनाच कसं मला मारता येईल हे कळेल! ते मला नको आहे. माझ्याकडे इनहेलरही असतो, कारण मला अस्थमा आहे.”
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झालं तर प्रियांका शेवटची ‘लव्ह अगेन’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात झळकली होती. सध्या ती ‘सिटाडेल’च्या सीझन २ चं प्रमोशन करत आहे. हा सीझन प्राईम व्हिडीओवर ६ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
