Nick Jonas on Indian Culture : लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस ही जोडी कायमच चर्चेत असते. प्रेक्षकांच्या आवडत्या सेलिब्रिटी जोडींपैकी ही एक आहे. प्रियांका व निक जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्यांचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. निक अनेकदा त्याच्या बायकोचं कौतुक करताना दिसतो. अशातच प्रियांकाशी लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला, हे त्यानं सांगितलं आहे.
प्रियांकाबरोबरच्या लग्नामुळे निकला भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरा असलेलं एक नवीन जग अनुभवता आल्याचं त्यानं सांगितलं. ‘सच संग शो’मध्ये झालेल्या संवादादरम्यान निकनं भारतीय संस्कृतीचा अभ्यास आणि या संस्कृतीमुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाला, याबद्दलचीही माहिती दिली.
माझ्या सुंदर आठवणी भारतातल्या आहेत
निक म्हणाला, “मी पहिल्यांदा भारतात आलो तेव्हा प्रियांकाचे कुटुंबीय आणि मित्र यांच्याबरोबर वेळ घालवला. तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी अनुभव होता. माझ्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी भारताशी जोडलेल्या आहेत आणि त्या खरंच छान आहेत. इथली संस्कृती समजून घेण्याची मला संधी मिळाली. मला अनेक भारतीय सण आणि परंपरा आवडतात.”
हिंदू धर्माबद्दल निक जोनस म्हणाला की…
हिंदू धर्माविषयी निकनं सांगितलं की, तो या धर्मातून खूप काही शिकला आहे. कर्मसिद्धान्त – म्हणजे जसे आपण इतरांशी वागतो, त्याचप्रमाणे आपल्याबरोबर घडतं. पुढे ‘धर्म’ या संकल्पनेचं महत्त्वही त्यानं अधोरेखित केलं. निकनं स्पष्ट केलं की, “आम्ही आमच्या मुलीला हिंदू मूल्यांची ओळख करून देत आहोत. बहुधर्मीय कुटुंबाचा भाग असल्याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.”
मला अपेक्षा होती, तशीच जोडीदार मिळाली
निकला मोठं एकत्रित कुटुंब आणि आपल्या विचारांशी विचार जुळणारी जोडीदार हवी होती. प्रियांकामुळे मला हवी तशीच जोडीदार मिळाली असल्याचं त्यानं सांगितलं. विविध संस्कृती जपणारे कुटुंब मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, हेही तो म्हणाला.
दरम्यान, निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांनी २०१८ मध्ये जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये भारतीय आणि अमेरिकन परंपरांनुसार लग्न केलं. नंतर २०२२ मध्ये सरोगसीद्वारे मुलगी मालतीचा जन्म झाला.
प्रियांकाच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच ती हैदराबाद येथे झालेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमाला उपस्थित होती. या चित्रपटात प्रियांका ‘मंदाकिनी’ ही भूमिका साकारणार आहे.

