Priyanka Chopra instragram post for Maa Behen : बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या तिचा ‘माँ बहन’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झालेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. भावनिक कथा, कलाकारांचा अभिनय व सशक्त मांडणी यांमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे कौतुक आता थेट ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिने केले असून, तिच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘देसी गर्ल’ म्हणून बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता हॉलीवूडमध्ये करिअर घडवत आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही प्रियांका आजही भारतीय चित्रपटसृष्टीशी जोडलेली असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रियांका चोप्रा हिने माधुरी दीक्षितच्या ‘माँ बहन’ चित्रपटाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले आहे. माँ बहन या चित्रपटामध्ये माधुरीसह तृप्ती डिमरी व धरना दुर्गा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रियांकाने या तिघींचे इन्स्टाग्रामवर कौतुक केले आहे.

चित्रपटाची गोष्ट चपखल अन् विनोदी

अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास हिने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर स्टोरीमध्ये ‘माँ बहन’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यासह प्रियांकाने लिहिले आहे की, हा चित्रपट खूपच हुशारीने बनवलेला आहे. चित्रपटाची गोष्ट चपखल, विनोदी आणि अतिशय सुंदर पद्धतीने सादर करण्यात आली आहे. माझी क्वीन माधुरी दीक्षित, नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रसंगात लक्ष वेधून घेतीये. तृप्ती डिमरीनेही अप्रतिम काम केले आहे, असे प्रियांका चोप्राने लिहिले.

धरना दुर्गासाठी प्रियांका चोप्राचा खास मेसेज

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने धरना दुर्गासाठी खास मेसेज लिहिला आहे. प्रियांका म्हणाली की, धरना, मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि पुढे तू काय कमाल करणार आहेस, हे पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशीच यशाची शिखरे गाठत राहा, अशा शुभेच्छा प्रियांका चोप्राने दिल्या आहेत. त्याचबरोबर तिने धरना दुर्गा हिचे खास कौतुक केले आहे. धरना दुर्गा ही लोकप्रिय कंटेंट क्रिएटर असून, हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.

प्रियांका चोप्रा हिची ‘माँ बहन’ चित्रपटासाठी खास पोस्ट

‘माँ बहन’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे केले कौतुक

पुढे प्रियांकाने लिहिले आहे की, सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हा चित्रपट अतिशय प्रामाणिक आणि सिनेमॅटिक वाटतो. दिग्दर्शक सुरेश त्रिवेदी यांचा दृष्टिकोन खूपच सुंदर आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन, असे लिहित अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘माँ बहन’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

प्रियांका चोप्राची अल्फासाठी खास पोस्ट

प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये काम करीत असली तरी तिचे बॉलीवूडच्या चित्रपटांकडे खास लक्ष असते. नुकताच अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या ‘अल्फा’ चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे. हा टीझरदेखील इन्स्टाग्रामवर शेअर करीत प्रियांकाने आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या खेळीसाठी आम्ही तयार आहोत, असे लिहीत प्रियांकाने आलिया भट्ट, बॉबी देओल व शर्वरी वाघ यांना टॅग केले आहे.