प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस यांनी २०१८ साली लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनी हे दोघे आई-बाबा झाले. २०२२ साली त्यांची मुलगी मालती मेरीचा जन्म झाला. प्रियांकाने तिच्या मुलीबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. प्रियांका म्हणाली होती, तिला तिची मुलगी मालती मेरीबरोबर तिचं तिच्या आईबरोबर जितकं घट्ट नातं आहे, तसंच तिच्याबरोबर निर्माण व्हावं असं वाटतं.
प्रियांका चोप्रा ‘अॅक्सेस हॉलीवूड’च्या मुलाखतीमध्ये म्हणाली होती, “मला आशा आहे की मी आजवर माझ्या आयुष्यामध्ये घेतलेल्या निर्णयांचा माझ्या मुलीला अभिमान वाटेल. तिचं माझ्यावर प्रेम असावं, मी तिला आवडावी अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या आईबरोबर कुठेही जायला खूप आवडायचं, तिलासुद्धा माझ्याबाबत असंच वाटावं ही अपेक्षा आहे.” प्रियांका व तिच्या आई मधु चोप्रा यांच्यामध्ये घट्ट नातं आहे. तर प्रियांकाच्या करिअरमध्येही तिच्या आईचा मोठा वाटा असल्याचं अभिनेत्रीने अनेकदा म्हटलं आहे. आई होण्याबाबतही तिला तिच्या आईने महत्त्वाचे सल्ले दिले होते. याबाबत अभिनेत्रीने मागे एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
प्रियांका चोप्रा व निक जोनस ही जोडी बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध जोडी आहे. हे दोघे अनेकदा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थित असतात; तर नुकतीच ही जोडी कान्स फिल्म फेस्टिवलला एकत्र पाहायला मिळाली होती. प्रियांका लग्नापूर्वीपासूनच अमेरिकेत असते तर घरातील कार्यक्रमानिमित्त व तिच्या कामानिमित्त ती भारतात येत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीच्या भावाचं लग्न झालं. यावेळी अभिनेत्री भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती, त्यावेळी प्रियांकासह तिचा नवरा निक जोनसही होता.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल तर प्रियांका अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. तिचा स्वत:चा व्यवसायसुद्धा आहे. अभिनेत्रीने नुकतीच आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. यावेळी ती चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी खास भारतात आली होती. यासह अभिनेत्री लवकरच ‘हेड्स ऑफ स्टेट’ या चित्रपटातून झळकणार आहे. २ जुलैला तिचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासह जॉन सीना, इड्रीस इलबा (Idris Elba) हे कलाकार झळकणार आहेत. यासह तिच्या ‘द ब्लफ’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरणही नुकतंच पूर्ण झालं आहे. सध्या अभिनेत्री ‘सिटाडेल’ या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं चित्रीकरण करत आहे.