प्रियांका चोप्रा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी जागतीक स्तारावरही त्यांच्या अभिनयाने ओळख मिळवली आहे. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने तिच्या कलेच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. अमेरिकेत कामानिमित्त गेल्यानंतर अभिनेत्रीने लोकप्रिय हॉलीवूड गायक निक जोनससह लग्न केलं. दोघांचा तिथे आलिशान असा बंगला असून त्यांच्या बंगल्यात अनेक लक्षवेधी गोष्टी आहेत.
मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे खूप महागड्या घरांमध्ये, बंगल्यामध्ये राहतात. कोट्यवधींच्या मालमत्तेचे ते मालक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे निक जोनस आणि प्रियांका चोप्रा. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे निक व प्रियांका यांचा कोट्यवधींचा आलिशान असा बंगला आहे.
कोट्यवधींच्या आलिशान बंगल्यात राहतात प्रियांका-निक
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार प्रियांका चोप्राने नवरा निक जोनसबरोबर २०१९ मध्ये हा आलिशान बंगला खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत तब्बल १७१ कोटी इतकी आहे. तब्बल २० हजार चौरस फुटांवर पसरलेल्या या प्रॉपर्टीमध्ये सात बेडरूम्स, ११ बाथरूम्स आहेत. या आलिशान घराचं इंटिरिअर प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या थीममध्ये करण्यात आलं असून, त्याला लाकडी वास्तुरचनेची जोड देण्यात आली आहे. लिव्हिंग रूममध्ये पांढरे सोफे आणि भिंती असून, हा भाग प्रशस्त आहे. तर डायनिंग एरियामध्ये याच्या तुलनेत वेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. डायनिंग एरियाच्या समोरच्या काळ्या दगडाच्या भिंतीमुळे संपूर्ण पांढऱ्या रंगाचं इंटिरिअर उठून दिसतं. या भिंतीखाली फायरप्लेस असून, थंडीत संध्याकाळी घरातील वातावरण उबदार ठेवण्यास त्याची मदत होते.
डायनिंग रूमच्या प्रवेशद्वाराजवळ आधुनिक कलेची तीन चित्रं लावण्यात आली आहेत, ज्या पांढऱ्या भिंतींवर आकर्षक दिसतात. तर मध्यभागी लटकवलेला झुंबर या जागेच्या सौंदर्यात भर घालत असून, घराला एक भव्य लूक देतो. डायनिंग रूमची रचना ख्रिसमस, ईस्टर आणि थँक्सगिव्हिंगसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रियांका आणि निक जोनास यांना निकच्या कुटुंबातील विविध परंपरा आणि संस्कृतीनुसार हे सण एकत्र साजरे करता येतात.
या घरातील इतर सुविधांमध्ये खास किचन, तापमान नियंत्रित वाइन रूम, इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, आकर्षक लाइटिंग असलेली खासगी बॉलिंग अॅली, होम थिएटर आणि स्पासह आलिशान एंटरटेनमेंट लाउंज व जिम यांचा समावेश आहे. या दाम्पत्याच्या घरात सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जिम देखील आहे. व्यावसायिक कामांमध्ये व्यग्र नसताना प्रियांका आणि निक येथे वर्कआउट करतात. त्यांच्या घरातील बॉलिंग अॅली हेही आकर्षणाचं एक वैशिष्ट्य आहे.
कामातून वेळ मिळाल्यावर दोघेही पूलमध्ये निवांत वेळ घालवतात. मात्र, होळी आणि दिवाळीसारखे भारतीय सण असताना हा परिसर पाहुण्यांसाठी खास मनोरंजनाचं ठिकाण बनतो. प्रियांका आणि निक आपल्या घरी होळी आणि दिवाळीच्या खास पार्ट्यांचं आयोजन करतात. प्रियांका आणि निकच्या घरातील भव्य स्विमिंग पूलभोवती लाकडी फ्लोअरिंग आणि फर्निचर आहे. या आलिशान हवेलीभोवती हिरवळीने नटलेला परिसर असून, महागड्या कार पार्क करण्यासाठी मोठं गॅरेज देखील आहे.
हे घर अनेकांसाठी स्वप्नवत ठरेल असं असलं, तरी त्यातील सर्वात खास आणि वैयक्तिक जागांपैकी एक म्हणजे प्रियांका आणि निकचं देवघर. या जागेचा वापर प्रार्थना आणि ध्यानासाठीही केला जातो. देवघरात पांढऱ्या रंगाची शिवमूर्ती ठेवण्यात आली असून, आजूबाजूला मेणबत्त्या लावलेल्या आहेत. तिथे चांदीची गणेशमूर्ती, शिवलिंग आणि इतर हिंदू देवतांच्या मूर्ती देखील आहेत. पूजा करण्यासाठी लागणाऱ्या अगरबत्ती, धूप आणि आरतीच्या साहित्याचीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या खास कोपऱ्यात प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांचा फोटो देखील ठेवण्यात आला आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास अनेकदा एकमेकांचे सण आणि सांस्कृतिक परंपरा उत्साहाने साजरे करताना दिसतात. गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त प्रियांकाने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये दोघे हिंदू रितीरिवाजांनुसार लक्ष्मीपूजा करताना दिसले होते. प्रियांका आणि निकने हे घर २०१९ मध्ये खरेदी केलं असलं, तरी Page Sixच्या वृत्तानुसार, घराची अवस्था राहण्यायोग्यच राहिली नव्हती, त्यामुळे त्यांना हे घर सोडावं लागलं होतं.
मे २०२३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील माहितीनुसार, हे घर खरेदी केल्यानंतर काही काळातच त्यातील पूल आणि स्पामध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या. वॉटरप्रूफिंगशी संबंधित समस्यांमुळे बुरशीची लागण आणि त्यासंबंधित इतर समस्या निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीनुसार, याच काळात घराच्या डेकवरील बार्बेक्यू परिसरातही पाण्याची गळती सुरू झाली होती. मात्र, अखेर २०२४ मध्ये प्रियांका आणि निक पुन्हा या आलिशान बंगल्यात राहायला आले.
