ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप स्टार निक जोनास यांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक व एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. निक जोनासने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) प्रियांका चोप्राला पहिला मेसेज केला होता. त्यानंतर दोघे भेटले आणि डेट करू लागले. पण ‘निक जीजूं’चा पहिला मेसेज नेमका काय होता, हे तुम्हाला माहीत आहे का? निक जोनासने स्वतः प्रियांकाला केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट दाखवला आहे.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. निक प्रियांका पेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या लव्ह स्टोरीची कायम चर्चा होत असते. तसेच दोघेही ट्विटरवरील त्या मेसेजबद्दल कायम बोलत असतात. एका पॉडकास्टमध्ये बोलताना निक जोनासने प्रियांका चोप्राला जो पहिला मेसेज केला होता, त्याचा स्क्रीनशॉट दाखवला. हा स्क्रीनशॉट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

निक जोनासचा मेसेज व प्रियांका चोप्राचा रिप्लाय

“हॅलो. मला काही लोकांनी म्हटलं की तू आणि मी भेटायला हवं. मलाही त्या लोकांचं म्हणणं पटतंय. तू इतक्यात लॉस एंजेलिसमध्ये येणार आहेस का?” असा मेसेज निक जोनासने प्रियांकाला केला होता. त्यावर प्रियांकाने मजेशीर उत्तर दिलं होतं. “ग्रॅहमने मला तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं आहे. आपण प्रायव्हेटमध्ये मेसेजवर बोलूया. कारण माझी टीम हे मेसेज पाहू शकते,” असा रिप्लाय प्रियांकाने निक जोनासला दिला होता.

Priyanka Chopra Nick Jonas First Twitter Message Love Story Screenshot
प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या मेसेजचा स्क्रीनशॉट

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांची लव्ह स्टोरी

सध्या निक जोनास व प्रियांका चोप्राच्या या पहिल्या मेसेजची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, या मेसेजनंतर ते फोनवर बोलू लागले. त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘व्हॅनिटी फेअर ऑस्कर आफ्टर-पार्टी’त झाली होती. निक तिथे आधीच उपस्थित होता. प्रियांकाने जेव्हा त्या पार्टीत प्रवेश केला, तेव्हा निक तिला पाहतच राहिला. तिथेच गुडघ्यावर बसून निकने प्रियांकाचं कौतुक केलं होतं. यानंतर मे २०१७ मध्ये त्यांनी ‘मेट गाला’ रेड कार्पेटवर एकत्र वॉक केला, ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या.

१९ जुलै २०१८ च्या मध्यरात्री निकने प्रियांकाला प्रपोज केलं होतं. प्रपोजलच्या अवघ्या काही महिन्यांनंतर, डिसेंबर २०१८ मध्ये भारतात त्यांचा भव्य आणि शाही विवाहसोहळा पार पडला होता. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये त्यांचं पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न झाले. तसेच त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनुसारही लग्न केले होते. लग्नानंतर तीन वर्षांनी निक व प्रियांकाने त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. मालतीचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता. आता प्रियांका व निक यांच्याबरोबर त्यांच्या लाडक्या लेकीचीही सोशल मीडियावर खूप चर्चा असते.