Priyanka Chopra Talks About Rajamouli : प्रियाका चोप्रा बॉलीवूडमधील एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती; पण हल्ली ती हॉलीवूडमधील चित्रपटांत काम करत असून बरीच वर्षं कुठल्याच हिंदी चित्रपटांत झळकलेली नाही. अशातच अभिनेत्री अनेक वर्षांनंतर भारतीय सिनेमात पुनरागमन करत आहे. प्रियांका राजामौलींच्या ‘वाराणसी’ या चित्रपटातून झळकणार असून, त्यामधून ती तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण आहे; पण प्रियांकानं चित्रपटात काम करण्यापूर्वी दिग्दर्शकासमोर एक अट ठेवली होती.
हिंदी चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाद्वारे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर प्रियांकानं हॉलीवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं; पण हॉलीवूडमध्ये काम करत असताना प्रियांका, हिंदी चित्रपटांमधील एक गोष्ट मिस करत आहे, असं तिनं सांगितलं आहे. प्रियांकानं एका मुलाखतीत तिनं कित्येक दिवस हिंदी चित्रपट केला नसून, त्यामुळे तिला बऱ्याच दिवसांपासून डान्स करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.
प्रियांकाने ठेवलेली ‘ही’ अट
‘सिनेमा ब्लाईंड’शी संवाद साधताना प्रियांका म्हणाली, “मी गेल्या सहा वर्षांत भारतीय चित्रपटात काम केलेलं नाहीये. त्यामुळे जेव्हा मला एस. एस. राजामौलींनी विचारलं आणि म्हणाले, “हे स्त्री पात्र खूप कुल आहे आणि तू याचा भाग असायला हवं वगैरे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, माझी एक विनंती आहे- मला डान्स करायचा आहे. हे शक्य आहे का? कारण- बराच काळ झालं मी डान्स केलेला नाही.”
प्रियांका व महेश बाबू यांनी एकत्र दिलेल्या या मुलाखतीत महेश बाबू म्हणाला, “राजामौलींनी तिची इच्छा पूर्ण केली.” प्रियांका त्यावर म्हणाली, “मी खरं तर विचारायला नको होतं. कारण- त्यामुळे आम्हाला खूप डान्स करावा लागला. आम्ही खूप डान्स केला आहे आणि बिचारा महेश मला म्हणत होता की, तुझ्यामुळे मलासुद्धा करावं लागत आहे.” महेश बाबू पुढे म्हणाला, “खूप मजा आली आणि आम्ही एका गाण्याचं शूटिंगही पूर्ण केलं आहे. ते गाणं सतत आमच्या डोक्यात सुरू होतं आणि ती सतत ते गाणं गुणगुणत होती.”
दरम्यान, महेश बाबू व प्रियांका चोप्रा पहिल्यांदा ‘वाराणसी’ या चित्रपटातून एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटातील या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ७ एप्रिल २०२७ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

