Priyanka Chopra Talks About Bollywood : प्रियांका चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, बॉलीवूडमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि हॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. अशातच अभिनेत्रीने बॉलीवूडबद्दल वक्तव्य केलं आहे.

प्रियांका चोप्रा नेहमीच तिची मतं आणि प्रतिक्रिया स्पष्टपणे मांडत असते. अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आतापर्यंत तिने अनेक गोष्टींबद्दल ठामपणे तिचं मत मांडलं आहे. अशातच आता not skiny but not fat या पॉडकास्टशी संवाद साधताना तिने बॉलीवूडबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने इंडस्ट्री का सोडली यामागचं कारणही सांगितलं आहे. प्रियांका चोप्रा बॉलीवूडबद्दल नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण

प्रियांकाने या मुलाखतीत तिने २००० साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर thamizan या तमिळ चित्रपटात काम केलेलं. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यामध्ये प्रियांकाबरोबर महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. त्यावेळी तिने पहिल्यांदाच कुठल्या अभिनेत्याची लोकप्रियता इतक्या जवळून अनुभवली याबद्दल सांगितलं आहे. प्रियांका म्हणाली, “विजय जेव्हा सेटवर यायचे तेव्हा तिथे खूप गर्दी व्हायची. लोक फक्त त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करायचे. जेव्हा ते डान्स आणि अभिनय करायचे तेव्हा मी एकाग्रतेने त्यांचं काम बघत होते. तो माझा पहिलाच चित्रपट असल्याने पडद्यामागे गोष्टी कशा सुरू असतात याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं.” प्रियांकाने चित्रपटात काम केलं तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती.

प्रियांका पुढे म्हणाली, “मला आधी वाटायचं की लोक फक्त प्रसिद्धीसाठी या क्षेत्रात काम करतात. परंतु, प्रसिद्धी या क्षेत्रात काम करण्याचा फक्त एक फायदा आहे. खरं काम तर खूप वेगळं असतं. बॉलीवूड आणि हॉलीवूड असे सगळे मिळून मी आत्तापर्यंत ७० चित्रपटांत काम केलं आहे.” प्रियांकाने पुढे यशाच्या शिखरावर असताना बॉलीवूड सोडण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सांगितलं आहे.

…म्हणून सोडलं बॉलीवूड

प्रियांका बॉलीवूड सोडण्यामागचं कारण सांगत म्हणाली, “भारतात काम करत असताना मला तेच तेच केल्यासारखं वाटत होतं. एकाच पठडीतलं काम केल्यानंतर मला वेगळ्या गोष्टी करून पाहायच्या होत्या. काहीतरी नवीन करण्यासाठी संधीच्या शोधात होते.” याचवेळी प्रियांकाला बॉलीवूडमध्ये तिच्यासाठी परिस्थिती अनुकूल नव्हती का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “आयुष्यात कोणाचाच प्रवास सोपा नसतो, प्रत्येक जण त्याची लढाई लढत असतो. पण, मी त्या लोकांपैकी एक आहे, ज्यांना घाणीत राहायला आवडत नाही; कारण जर तुम्ही अधिक काळ तिथे राहिला तर त्याची तुम्हाला सवय होते.”