Bollywood Actress on her marriage: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. हे जोडपे विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. प्रियांका बॉलीवूड, दाक्षिणात्य तसेच हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करते; तर निक हा लोकप्रिय गायक आहे.
प्रियांका आणि निकच्या लग्नाला आता आठ वर्षे झाली आहेत. अनेकदा हे जोडपे विभक्त होणार आहे किंवा ते घटस्फोट घेत आहेत, अशा चर्चा होताना दिसतात. आता प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे.
“आमच्या लग्नाला आठ वर्षे…”
गोल्डन ग्लोब्ज या पुरस्कार सोहळ्यात निक आणि प्रियांका एकत्र न येता वेगवेगळे आले होते, त्यानंतर त्यांच्या नात्यात समस्या सुरू आहेत, अडचणी सुरू आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता व्हरायटीला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका म्हणाली, “आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. आमचे नाते बिघडावे असे लोकांना वाटत असेल तर ती त्यांची निवड आहे. आता लोक आमच्या नात्याबद्दल काय सतत चर्चा करतात, याबद्दल समजून घेणे, त्यावर विचार करणे सोडून दिले आहे.”
प्रियांका पुढे असेही म्हणालेली, आम्हा दोघांची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. मी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे, त्यामुळेसुद्धा लोकांना आमचं लग्न स्वीकारणं कठीण गेलं असेल. ती म्हणाली, “मला माहीत नाही की आमच्या लग्नात असं काय होतं, जे लोकांना चुकीचे वाटत आहे. वेगळे देश, वेगळे धर्म, वयातील अंतर, वेगळी संस्कृती या सगळ्या गोष्टींमुळे लोकांना आमचे लग्न टिकणार नाही असे वाटत असेल.”
लोक सतत लग्नाबद्दल बोलत होते, त्यामुळे वाईट वाटल्याचे सांगत प्रियांका म्हणाली, “लोक सतत आमच्या नात्याकडे शंकेच्या नजरेने बघतात, त्यामुळे वाईट वाटते. आम्ही दोघेही असा विचार करतो, या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही.”
अभिनेत्री असेही म्हणाली की, सुरुवातीला आमच्या नात्याबद्दल मीसुद्धा साशंक होते, कारण निकला भेटल्यानंतर मी सहा महिन्यातच त्याच्याशी लग्न केले होते. जेव्हा मी त्याच्याशी लग्न केले, तेव्हा ते खरे आहे यावर मला विश्वास बसत नव्हता.
निक एक पती आणि वडील म्हणून उत्तम आहे, असे म्हणत प्रियांकाने कौतुक केले. ती म्हणाली, “निक त्याच्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडतो. तो दररोज मला प्रेरित करतो. तो प्रामाणिक आहे. त्याने खूप लहान वयात काम करायला सुरुवात केली, त्याचे पालक खूप चांगले आहेत, संतासारखे आहेत.”
निकने काही दिवसांपूर्वीच जय शेट्टीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने प्रियांकाची ओळख तिच्या ‘क्वांटिको’ शोमुळे झाली असल्याचे सांगितले. तसेच, पहिल्या डेटपासूनच मला माहीत होते की मला प्रियांकाबरोबर लग्न करायचे आहे, असेही निक म्हणाला.
प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२२ मध्ये त्यांना मुलगी झाली, तिचे नाव मालती मेरी असे आहे.

