Priyanka Chopra Siddhivinayak Mandir Visit : बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या भारतामध्ये आली आहे. प्रियांकाच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. एस. एस. राजमौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा व दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांची जोडी झकळणार आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी भारतामध्ये आलेल्या प्रियांकाने मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले आहे.
लवकरच गणेशोत्सव सुरू होणार असून, मुंबईमध्ये सर्वत्र बाप्पांच्या पहिली झलक आणि देखाव्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामध्ये आता अनेक वर्ष परदेशामध्ये राहिलेल्या प्रियांका चोप्राने गणरायाचे दर्शन घेतले आहे. मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये प्रियांकाने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारातील प्रियांकाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून, तिच्या कपाळावर गंध लावल्याचे दिसून येत आहे.
प्रियांका चोप्राने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
भक्तिभावाने गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर प्रियांका चोप्रा मंदिरातून बाहेर पडताना दिसली. यावेळी तिने पायांत कोणतीही चप्पल किंवा पादत्राणे घातलेली नव्हती. मंदिराबाहेर आल्यानंतर प्रियांकाने पापाराझींना हसून नमस्कार केला. यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये प्रियांका चोप्राने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याचे दिसून आले. दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव दिसून येत होता. सिद्धिविनायक मंदिरातील प्रियांकाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
परदेशात राहून संस्कृती आणि परंपरा जपणारी प्रियांका चोप्रा ही भारतीय सण आणि उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे करत असते. अनेकदा सोशल मीडियावर प्रियांका ही तिची मुलगी मालती मेरीला भारतीय संस्कृतीची ओळख करुन देत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांका ही मालतीला दुर्गा देवीचा मंत्र शिकवीत असल्याचे दिसून आले. मालती मेरी तिच्या आईच्या मागे ‘दुर्गा सप्तशती’मधील ‘सर्वमंगल मांगल्ये…’ हा श्लोक म्हणत होती. परदेशात राहूनही भारतीय परंपरेशी जोडून राहणाऱ्या प्रियांकाने आता सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.
एस. एस. राजमौली यांच्या वाराणसी सिनेमात झळकणार
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अनेक वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही भारतीय सिनेमामध्ये पुन्हा एकदा झळकणार आहे. एस. एस. राजमौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटात दिसणार असून, त्यामध्ये ती अभिनेता महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. वाराणसी हा सिनेमा ७ जुलै २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महेश बाबूच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाने या सिनेमातील त्याचे काही खास फोटो शेअर केले होते. ‘वाराणसी’मध्ये महेश बाबू रुद्र हे पात्र साकारणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी प्रियांका चोप्रा भारतामध्ये वास्तव्यास आली आहे.
