Priyanka Chopra Talks About Bollywood : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. इंडस्ट्रीतील त्यांच्या अनुभवांबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल तसेच समाजातील मुद्द्यांवर ते स्पष्टपणे बोलत असतात. त्यांच्या प्रतिक्रिया वेळोवेळी व्यक्त करत असतात. यापैकीच एक नाव म्हणजे प्रियांका चोप्रा.

प्रियांका चोप्राने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर हॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथेही प्रियांकाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. अशातच आता अभिनेत्रीने स्वत: याबद्दल सांगितलं आहे.

प्रियांकाने बॉलीवूडबाहेर कामं शोधायला सुरुवात केली, कारण तिला इंडस्ट्रीत रोखून धरल्यासारखं वाटत होतं. तिला हव्या तशा भूमिकांसाठी विचारणा होत नव्हती; याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. प्रियांकाने २०१२ साली हॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. प्रियांका चोप्राने आधी हॉलीवूडमध्ये टेलिव्हिजनवर काम केलं, नंतर ती चित्रपटांत झळकू लागली. ‘फर्स्टस्पॉट’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या हॉलीवूडमधील करिअरबद्दल विचारल्यानंतर तिने याबद्दल सांगितलं आहे.

Award Banner

बॉलीवूडबद्दल काय म्हणाली प्रियांका?

मुलाखतीत प्रियांका म्हणाली, “मला कधीच बॉलीवूड सोडायचं नव्हतं. हिंदी चित्रपटांत काम करत असताना मला खूप कारणांमुळे रोखून धरल्यासारखं आणि थांबवल्यासारखं वाटलं. मला खूप काही वेगळं करायचं होतं. मला कलाकार म्हणून वेगळी संधी शोधण्याची गरज वाटत होती. मी अमेरिकेत काम करायला सुरुवात केली आणि आता १२ वर्षांनंतरही मी खूप चांगली कामं करत आहे.”

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार प्रियांकाने २०१९ पासून कुठल्याही बॉलीवूड चित्रपटात काम केलेलं नाही, तर आता अनेक वर्षानंतर ती भारतीय सिनेमामध्ये पुनरागमन करत आहे. अभिनेत्री राजामौलींच्या ‘वाराणसी’मधून दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करत आहे. प्रियांका पुढे म्हणाली, “मला भारतीय चित्रपट आवडतात. वाराणसी करताना मला खूप आनंद होत आहे. मला दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना आनंद होत आहे. दोन्हीकडे काम करताना मजा येतेय. सांस्कृतिक फरक आहेत, पण मला काम करायला आवडत आहे.”

यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये प्रियांका म्हणालेली की मी नेपो बेबी नाहीये, मला कुठल्याही मोठ्या कलाकारांचा पाठिंबा मिळाला नाही. असे बरेच कलाकार आहेत, ज्यांच्या घरातील सदस्य इंडस्ट्रीत असल्याने त्यांना पाठिंबा मिळाला, मदत झाली; परंतु माझे कोणते काका किंवा कोणीही यामध्ये नसल्यामुळे माझ्याबाबतीत असं काहीच झालं नाही.

दरम्यान, प्रियांका तिच्या आगामी ‘बल्फ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने स्वत: स्टंट केले आहेत. तिने सांगितलं की, या चित्रपटातील ८० टक्के स्टंट तिने स्वत: केले आहेत.