बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आधी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आणि मग हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम करीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यापैकीच एक नाव म्हणजे सध्या ऑस्करमुळे चर्चेत असणारी प्रियांका चोप्रा. प्रियांका चोप्रानं दाक्षिणात्य चित्रपटात काम करीत मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं.

प्रियांका चोप्रानं नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावलेली. यावेळी तिच्या लूकचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. प्रियांका नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. यावेळी तिनं दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला आहे.

प्रियांकानं अवघ्या १८ व्या वर्षी २००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर Thamizan या तमीळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती मुख्य भूमिकेत होता. प्रियांकाचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं ती विजयची लोकप्रियता पाहून अवाक झाली होती आणि तिनं तो अनुभव Not Skinny But Not Fatला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. प्रियांका विजयबद्दल नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

विजय थलपतीबद्दल काय म्हणाली प्रियांका?

विजयबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत प्रियांका म्हणाली, “मी थामीझान नावाच्या तमीळ चित्रपटात काम केलं होतं. लोकप्रियता काय असते याचा अनुभव पहिल्यांदाच मी या चित्रपटातून घेतला. त्यात माझा सहकलाकार विजय होता, जो खूप लोकप्रिय आहे आणि मला आठवतंय की, तो सेटवर यायचा तेव्हा खूप लोक असायचे. मोठ्या संख्येनं लोक त्याचा अभिनय, नृत्य पाहण्यासाठी गर्दी करायचे.”

प्रियांका चोप्रा १८ व्या वर्षी पहिल्यांदाच चित्रपटात काम करण्याबद्दल म्हणाली, “तो माझा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे पडद्यामागे काय होतं याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी विचार करायचे की, इतकी प्रसिद्धी असताना कसं वाटत असेल, विशेषकरून भारतात जिथे प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडतात आणि ते तुमच्यावर खूप प्रेमही करतात.”

प्रियांकाला पुढे विजयइतकीच प्रसिद्धी मिळावी, असं कधी वाटायचं का, असं विचारल्यानंतर तिनं सांगितलं की, आधी ती अभिनय आणि प्रसिद्धी यांना एकच समजायची. ती म्हणाली, “मी १८ वर्षांची असताना मला असं वाटायचं की, प्रसिद्धीच सगळं काही असते का? मला असं वाटायचं की, हे सगळं प्रसिद्धीसाठीच असतं. पण जेव्हा मी पूर्णपणे या क्षेत्रात सक्रिय झाले तेव्हा जाणवलं की, लोकप्रियता, प्रसिद्धी या क्षेत्राचा भाग आहेत. अभिनयाबरोबर त्या येतात; पण ते काही वेगळं काम नाहीये”.