Priyanka Chopra Thanks Aishwarya Rai & Irrfan Khan : प्रियांका चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर तिने हॉलीवूडमध्येही काम करायला सुरूवात केली. परंतु, तिच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अशातच आता तिने ऐश्वर्या राय व दिवंगत अभिनेते इरफान खान यांचे आभार मानले आहेत.

प्रियांकापूर्वी ऐश्वर्या राय व इरफान खान यांनी हॉलीवूड चित्रपटांत काम करत तिथेही त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आणि इतरांसाठी एक नवीन मार्ग तायर केला. परंतु, आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी हॉलीवूडमध्ये काम केलं आहे. मात्र, प्रियांका चोप्रा ही सातत्यानं तिथे काम करीत असून, तिने तिथेही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्राने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. ऐश्वर्या व इरफान यांच्याबद्दल प्रियांका काय म्हणाली ते जाणून घेऊयात…

प्रियांका चोप्राने मानले आभार

हॉवर्ड इंडिया कॉन्फरन्सदरम्यान अभिनेत्री म्हणाली, “मला खूपदा असं वाटतं की, माझ्या आधी इथे येऊन, काही हुशार आणि कलागुणांनी संपूर्ण असलेल्या कलाकारांनी काम केलं आहे, ज्यामुळे माझा मार्ग सोपा झाला आहे. ऐश्वर्या राय एक उत्तम अभिनेत्री आहे. ती हॉलीवूडमध्ये काम करत होती. इरफान खान यांनीसुद्धा काम केलं आहे. त्यांनी काम केलं असल्यानं मला ते करणं सोपं गेलं.”

ऐश्वर्या रायनं यापूर्वी हॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तिनं ‘द पिंक पँथर २’, ‘रावण’, ‘अॅक्शन रिप्ले’, ‘द लास्ट लीजन”, प्रोवोक्ड’, ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पायसीस’, ‘ब्राइड अँड प्रीजुडाइयस’ यांसारख्या चित्रपटांत काम करत तिच्या सहजसुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिनं जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

इरफान खान यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ‘जुरॅसिक वर्ल्ड’, ‘द अमॅझिंग स्पायडर मॅन’, ‘इनफेरनो’, ‘लाइफ ऑफ पी’ यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांत काम केलं आहे. इरफान खान यांनी बॉलीवूडमध्येही उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अनेक कलाकारही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. त्यामुळेच आज ते हयात नसतानाही अनेक जण त्यांना ‘मिस’ करत असतात.

दरम्यान, प्रियांका चोप्राबद्दल बोलायचं झालं, तर याव्यतिरिक्त अभिनेत्री सध्या तिच्या आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामधून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे; तर तब्बल सहा वर्षांनी भारतीय सिनेमात ती पुनरागमन करत आहे.