Nick Janos Talks About Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा व निक जोनस लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. मनोरंजन विश्वात या दोघांचं मोठं नाव आहे. दोन वेगळ्या देशांमधून असलेल्या प्रियांका व निक जोनास यांची लव्ह स्टोरीसुद्धा तितकीच खास आहे. अशातच निक जोनसने प्रियांका बरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
निक जोनस हॉलीवूडमधील लोकप्रिय गायक आहे. प्रियांका बरोबर लग्न झाल्यानंतर भारतातील अनेकांच्या तो परिचयाचा झाला. अशातच त्याने नुकत्याच जय शेट्टीला दिलेल्या मुलाखतीत त्याची व प्रियांका चोप्रा यांची पहिली भेट कशी होती याबद्दल सांगितलं आहे. निक जोनस नेहमीच प्रियांकाची काळजी घेताना आणि तिचं कौतुक करताना पाहायला मिळतो, त्यामुळे अनेकांना दोघे कपल गोल वाटतात.
मुलाखतीत निक प्रियांकाबद्दल म्हणाला, “मी पहिल्यांदा प्रियांकाला बिलबोर्डवर पाहिलं होतं, तेव्हा मला वाटलं की ही खूप भारी आहे. मी चित्रपटासाठी काम करत असताना एका व्यक्तीला भेटलो, ज्याने प्रियांकाबरोबर काम केलेलं आणि तो मला म्हणाला की तुम्ही दोघे एकमेकांना भेटत का नाही. पण, त्याने कधीच आमची भेट घडवून आणली नाही. पुढे मग काही महिन्यानंतर मी संयम संपल्यामुळे ट्विटरवर (आत्ताच्या एक्सवर) गेलो, तेव्हा मला दिसलं की प्रियांकाने मला फॉलो केलं आहे. पण, ती आता असं म्हणते की आम्ही दोघांनीही एकमेकांना फॉलो केलेलं.”
पहिल्या भेटीतच निक जोनसला पाहावी लागलेली प्रियांकाची वाट
निक पुढे म्हणाला, “तिने मला फॉलो केल्यानंतर मी तिला मेसेज केला. त्यानंतर एक वर्षानंतर आम्ही ड्रिंक पिण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये भेटलो. मी ४५ मिनिट तिची वाट पाहिल्यानंतर तिथून निघून जाणार होतो, कारण तिला यायला खूप उशीर झाला होता. पण, सुदैवानं मी तिथे थांबलो आणि ती आल्यानंतर आमच्यामध्ये खूप चांगल्या गप्पा झाल्या. त्यानंतर आम्ही अजून एक ड्रिंक घेण्यासाठी तिच्या घरी गेलो, त्यावेळी तिची आई तिथे होती; त्यामुळे आम्हा दोघांच्या पहिल्या भेटीतच मी तिच्या आईलासुद्धा भेटलो, जी खूप चांगली गोष्ट झाली.”
निक याबद्दल पुढे म्हणाला, “तोवर आमच्यामध्ये काहीच नव्हतं, पण एकमेकांबरोबर बोलल्यानंतर साधारण एक वर्षानंतर मी म्हटलं की, नाही आता याकडे गांभीर्याने पाहायला हवं आणि म्हटलं की जेव्हा तू पुन्हा लॉस एंजिलियसला येशील तेव्हा आपण डेटवर जाऊ.”
