Nick Jonas Praises Wife Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा व निक जोनस हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर प्रियांकाने हॉलीवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे तिचे अनेक सहकलाकार आणि चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत असतात. अभिनेत्रीचा नवरा गायक निक जोनससुद्धा अनेकदा बायकोचं कौतुक करताना दिसतो. अशातच आता त्यानं त्यांच्या लेकीच्या जन्मावेळी प्रियांकानं परिस्थिती कशी खंबीरपणे हाताळली होती याबद्दलची माहिती देत तिचं कौतुक केलं आहे.
प्रियांका चोप्रा व निक जोनस यांच्या लेकीचा मालती मेरीचा जन्म २०२२मध्ये झाला. परंतु, जन्मानंतर तिला बराच काळ रुग्णालयात ठेवावं लागलेलं आणि तिची प्रकृती नाजूक होती, असं निकनं सांगितलं. लेकीबद्दल बोलताना निक भावूक झाला. जय शेट्टीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं याबद्दल सांगितलं आहे. निक जोनस लेक मालती मेरी आणि पत्नी प्रियांकाबद्दल नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
निक जोनसची लेकीबद्दल प्रतिक्रिया
मुलाखतीत निक जोनस म्हणाला, “मी तरुणपणातील स्वत:ला हे सांगेन की, तुझं अभिनंदन. कारण- तुझं प्रियांका चोप्रा जोनसबरोबर लग्न झालं. हे खूप छान आहे आणि आमची मुलगीसुद्धा खूप कमाल आहे. नुकतीच ती चार वर्षांची झाली आहे. मला याबद्दल आश्चर्य वाटतं. मी तिच्याकडे बघतो आणि तिच्या भविष्याचा विचार करतो आणि मला माहितीये की, ती खूप उत्तम गोष्टी करणार आहे.”
निक जोनसने सांगिता लेकीच्या जन्माचा प्रसंग
लेकीच्या जन्माबद्दल निक पुढे भावूक होत म्हणाला, “ती सर्वगुण संपन्न आहे. तिचा जन्म खूप नाजूक परिस्थितीत झाला. २०२२ मध्ये तिचा जन्म झाला. आम्ही त्या वर्षी एप्रिल महिन्याची वाट पाहत होतो; पण आम्हाला सांगण्यात आलं की, तिचा जन्म लवकर होईल. सरोगसीमार्फत तिचा जन्म झाला. आम्ही चिंतेत होतो. जन्मावेळी ती १ पाउंड ११ औंसेस(ounces) इतकी होती आणि तिची त्वचा जांभळ्या रंगाची होती.” पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा रंग असा होतो, असं म्हटलं जातं.
निक पुढे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानत म्हणाला, “रुग्णालयातील कर्मचारी त्वरित मदतीला आले. त्यांनी तिला पुन्हा श्वास घेण्यास मदत केली, पटकन उपचार केले आणि श्वास घेण्यासाठी नळी (ट्यूब) घातली.” पुढे त्यानं मालतीच्या जन्मानंतरची तीन महिने तिच्यासाठी किती खडतर होती याबद्दल सांगितलं आहे. गायक म्हणाला, “कोविडच्या काळात मी आणि माझी बायको ३.५ महिन्यांपर्यंत रुग्णालयात १२-१२ तासांच्या शिफ्टमध्ये थांबत होते. तो अनुभव खूप कठीण होता. आजही मला हे सगळं स्पष्ट आठवतं, जणू रुग्णालयाचा वासही अजून आठवतो.”
लेकीच्या जन्मानंतरच्या कठीण परिस्थितीबद्दल तो पुढे म्हणाला, “दररोज तिथे असणं, आधार देणं भीतीदायकही होतं. कारण- इतर कुटुंबंही तशाच परिस्थितीतून जाताना दिसत होती. बाळानं उपचारांना चांगली साथ दिली आणि हळूहळू तिचं वजन वाढू लागलं. सहा वेळा रक्त चढवल्यानंतर तिची प्रकृती सुधारली आणि ३.५ महिन्यांनंतर तिला घरी घेऊन जाता आलं.”
निकने बायको प्रियांका चोप्राचं केलं कौतुक
प्रियांकानं ही कठीण परिस्थिती खूप खंबीरपणे हाताळल्याचं सांगत तिचं कौतुक करत निक जोनस पुढे म्हणाला, “प्रियांका आणि माझ्यामध्ये त्यावेळी दररोज याबद्दल चर्चा व्हायची. आम्ही मालतीची आणि एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो. पालकत्व सगळ्यांसाठीच जरा अवघड असतं. विशेषकरून सुरुवातीच्य काळात. आम्ही एकमेकांना खूप समजून घेतलं. माझी बायको खूप हुशार आहे. तिनं खूप मनापासून आणि एका दृष्टिकोनातून ही परिस्थिती हाताळली. माझ्यासाठी ते खूप प्रेरणादायी होतं. त्या कठीण काळात आमच्या लेकीसाठी प्रियांका खूप खंबीर होती.”

